कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी भारताचे शर्थीचे प्रयत्न – शेखर मांडे

नागपूर, दि.6 – कार्बन उत्सर्जन ही मानवापुढील मोठी समस्या आहे. सन 2070 पर्यंत टप्प्या टप्प्याने कार्बन उत्सर्जन हे शून्यावर आणण्यासाठी भारताने शर्थीचे प्रयत्न सुरु केले असून देशात आगामी सर्व वैज्ञानिक व औद्योगिक धोरणांमध्ये ह्याच बाबीवर भर देण्यात आला आहे, असे सीएसआयआरचे माजी संचालक डॉ. शेखर मांडे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

तसेच निर्माल्यापासून अत्तर, अगरबत्त्ती इ. उत्पादन करण्याचे प्रयत्न नागपूर मनपामार्फत राबविण्यात येऊन त्यातून रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती ‘निरी’ चे संचालक अतुल वैद्य यांनी दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठात भारतीय विज्ञान काँग्रेस आयोजित करण्यात आली आहे. आजच्या चौथ्या दिवशी डॉ. शेखर मांडे हे आज पत्रकारांशी वार्तालाप करत होते.  त्यांच्या समवेत ‘निरी’ चे संचालक अतुल वैद्य हे ही उपस्थित होते.

डॉ. मांडे म्हणाले की, मानवतेपुढे पर्यावरणीय बदल ही सगळ्यात मोठी समस्या आहे. त्यासाठी कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणणे हे 2070 पर्यंत साध्य करावयाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी तशी वैज्ञानिक आणि औद्योगिक धोरणे आखली जात आहेत. कार्बनचे उत्सर्जन हे प्रामुख्याने ऊर्जानिर्मितीशी संबंधित आहे. त्यासाठी पर्यायी ऊर्जा स्त्रोत निर्माण करणे, तसेच अपरिहार्य असलेल्या ज्वलनातून निर्माण होणारा कार्बन पर्यावरणात जाऊ न देण्यासाठी पर्यावरणपूरक यंत्रणा निर्मिती करणे अशा दोन्ही पर्यायांवर सध्या विविध आघाड्यांवर कामे सुरु आहेत. अनेक पर्याय आहेत.  त्यातील अधिक योग्य पर्यायांची निवड करणे हे मोठे जिकीरीचे आहे. त्यासाठी निवडावयाच्या पर्यायातून आणखी काही दुष्परिणाम होऊ नयेत ही दक्षता घेणे आवश्यक आहे.

डॉ. मांडे म्हणाले की, जिमोन सेक्वेंसिंग करण्याचे महत्त्वाकांक्षी काम सुरु आहे. देशातील सात कोटी लोकांमध्ये जनुकीय आजार आहेत. त्यासाठी हे करणे आवश्यक असून त्यादृष्टीने महत्त्वाचे काम सुरु आहे.

औष्णिक विद्युत प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या राखेच्या पुनर्वापरासाठी अनेक पर्याय निर्माण केले जात आहेत. त्यापासून विटा, रस्ते बांधणी, टाईल्स निर्मिती इ. कामांमध्ये या राखेचा पुनर्वापर करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलाद निर्मितीतून निर्माण होणारी मळी रस्ते बांधकामात वापरण्याबाबतचे तंत्रही विकसित करण्यात आले असून ते लाभदायक ठरत असल्याचे दिसून आल्याचे मांडे यांनी सांगितले.

निरीचे निदेशक अतुल वैद्य यांनी सांगितले की, सीएसआयआर, लखनौ येथील सीमॅप, निरी यांच्या सहयोगातून नागपूर मनपा शहरातील देवस्थाने, मंदिरे, तसेच सण उत्सवांच्या काळात वापरून वाया जाणाऱ्या फुले, निर्माल्यांपासून सुगंधी द्रव्ये, अगरबत्त्ती इ. सारखे पदार्थ तयार करुन त्यातून रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सर्व तांत्रिक सहाय्य नागपुर मनपाला निरी, सीमॅप, सीएसआयआर या संस्था देणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

00000