मुंबई, दि. २० : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ या अकराव्या अखिल भारतीय मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुशायऱ्यात देशभरातून १७ नामवंत शायर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास सर्वांना प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात नामवंत शायर सहभागी होणार असून वसीम बरेलवी, कलीम समर, मदन मोहन दानिश, शारीख कैफी, रणजीत चौहान, हमीद इक्बाल सिद्धीकी, शाहीद लतिफ, कैसर खालिद, कमर सिद्धीकी, डॉ. जाकीर खान जाकीर, समीर सावंत. डॉ. प्रज्ञा विकास, महशर फैजाबादी, नजर बिजनौरी, उबैद आझम आझमी हे शायर या कार्यक्रमात मुशायऱ्याचे सादरीकरण करणार आहेत. अतहर शकील हे सूत्रसंचालन करणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर तसेच साहित्य क्षेत्रातील विविध नामवंत या कार्यक्रमास निमंत्रित आहेत. सन २०१३ पासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दिल्ली येथे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या मुशायरा कार्यक्रमाच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाद्वारे 2013 पासून गेटवे ऑफ इंडिया येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मुशायऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या मुशायरा कार्यक्रमांमध्ये देशभरातील नामवंत शायर उर्दू साहित्य, शेरोशायरीचे सादरीकरण करतात.
००००
इरशाद बागवान/विसंअ