मुंबई, दि. २२ : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यंदाचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय मतदार दिन’ महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक मिलिंद बोकील, अभिनेता गौरव मोरे, निवडणूक दूत सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या या सोहळ्याचा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या लोकशाही दिंडीने होणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, नवमतदारांना मतदार ओळखपत्र वाटप, मतदान निष्ठेची शपथ ग्रहण, मतदार जागृतीसंबंधी केलेल्या उपक्रमांच्या पुस्तिकेचे प्रकाशन, इत्यादी कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.
या कार्यक्रमात महाराष्ट्रात मतदार नोंदणी आणि मतदार जागृती यासंबंधी उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सामाजिक संस्था, पत्रकार आणि समाजमाध्यमांवर उत्तम कार्य केलेले निवडणूक कार्यालय यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माझा गणेशोत्सव – माझा मताधिकार’, ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ या राज्यस्तरीय स्पर्धांतील विजेत्यांनाही पुरस्कार दिले जातील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय रांगोळी आणि भित्तीपत्रक या स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके दिली जातील.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या या कार्यक्रमात विद्यापीठ परिसरात मतदार जागृती दालन उभारण्यात येणार असून सापशिडी, लुडो यांसारख्या खेळांतून विद्यार्थ्यांना मतदान, निवडणूक यासंबंधी प्रक्रिया समजावून सांगितली जाईल. अभिरूप मतदान केंद्राचे दालन, निवडणुकीसंबंधी प्रदर्शन आणि विविध आकर्षक साहित्यांनी सुशोभित लोकशाही भिंत इथे उभारण्यात येणार आहे. तसेच, नागरिकांनी मतदान करणे का आवश्यक आहे, यासंबंधीचे पथनाट्य सादरीकरणही होईल.
२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस २०२१ पासून संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील मतदारांना समर्पित करण्यात आलेल्या या दिवशी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा, तालुका आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पातळीवरही विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
000