प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई, दि. 24- भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 26 जानेवारी रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज झाली. यावेळी सहसचिव तथा सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या रंगीत तालमीत भारतीय नौदल, तेलंगना पोलीस पथक, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई रेल्वे पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-60 पथक, गृहरक्षक दल पुरूष व महिला,  बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल यांच्यासह विविध पथ दल, विभाग, शाळा, पथक यांनी सहभाग घेतला.

तसेच, राज्य शासनाच्या 16 विभागांनी जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह तालमीत सहभाग घेतला.

उत्कृष्ट संचलन पुरस्कार

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 1 मे 2022 रोजी झालेल्या महाराष्ट्र दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार सिंग यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यामध्ये बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकास प्रथम, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलास द्वितीय तर राज्य राखीव पोलीस बलास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

00000