प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा!

मुंबई, दि. २५ : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमिताने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्ध व्यवसाय विकास राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या या मंगलदिनी थोर स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त, क्रांतीकारक, शहीद, समाजसुधारक व देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांप्रति मी आदर व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे. २६ जानेवारी १९५० या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्य कारभार सुरू झाला. रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत. अशा विविधतेतूनही एकता, समानता, बंधुत्व जपणाऱ्या, अनेक संस्कृतींनी, परंपरांनी नटलेला आपला देश आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये प्रदान करणाऱ्या भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहूया, असे आवाहनही राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

000