संवर्धन मराठी भाषेचे

मराठी भाषा -विशेष लेख :

मराठी भाषा विभागाच्या वतीने दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. या निमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभागाकडून घेण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णय व उपक्रमांची माहिती देणारा विशेष लेख.

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कला यांना एक दीर्घ परंपरा व स्वतंत्र ओळख आहे. महाराष्ट्राच्या या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन मुंबई येथे अलीकडेच मराठी भाषा विभागाकडून आयोजित करण्यात आले होते. या विश्वसंमेलनाला जगभरातील मराठी प्रेमींकडून उर्त्स्फुत प्रतिसाद लाभला. मराठीच्या संवर्धनासह प्रचार प्रसारासाठी विभागाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

मराठी भाषेचा विकास प्रचार-प्रसार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी या दृष्टीने ‘पुस्तकाचे गाव’ विस्तार ही योजना व्यापक स्वरुपात सुरु करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुस्तकांचे गाव ही योजना विस्तारित स्वरुपात सुरु करताना पहिल्या टप्प्यात पुस्तकाचे गाव विभागीय स्तरावर सहा महसूली विभागात सुरु करण्यात येणार आहे. अमरावती व नाशिक या महसूली विभागात पुस्तकाचे गाव सुरु करण्यात येणार आहे.

वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने मराठी/अमराठी लोकांमध्ये मराठी बाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून या वर्षी महानगरपालिका स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेचे संवर्धन प्रचार प्रसार यांच्याशी संबंधित उपक्रमांमध्ये वापरण्यात येणारी भित्तिपत्रके, पताका इत्यादींमध्ये विभागाने प्रायोजकत्व स्वीकारलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि प्रसिद्धीमाध्यमांमध्ये द्यावयाच्या विभागाच्या जाहीरातींमध्ये वापरण्यासाठी  बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांना/ मंडळांना अर्थसहाय्य/अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी अर्थसहाय्य’ हा उपक्रम म्हणून या विभागाच्या अधिनस्थ राज्य मराठी विकास संस्था यांचेमार्फत राबविण्यात येणार आहे यात मराठी साहित्याची ओळख व्हावी. मराठी साहित्याविषयी वाचकांचे प्रेम वाढावे म्हणून महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांतील नामवंत साहित्यिक, विचारवंत, कथाकार, कवी यांची व्याख्याने आयोजित करणे तसेच मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करुन देणे, संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेतील संस्कारक्षम पुस्तके अल्प दरात वाचकांना उपलब्ध करुन देणे, ना नफा ना तोटा तत्वावर मराठी भाषेतील पुस्तकाच्या प्रकाशनास मदत करणे, पुस्तके विक्रीस उपलब्ध करून देणे, मराठी बाल, युवा व प्रौढ साहित्य संमेलनांचे आयोजन करणे, सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा विषयक स्पर्धा परीक्षा आयोजित करणे व त्यासाठी अभ्यासिका केंद्राची उभारणी करणे आदींचा समावेश आहे

सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, मराठी पाठ्यपुस्तके इत्यादींमध्ये तसेच ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होतो अथवा भविष्यात केला जाणार आहे अशा सर्व ठिकाणी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इत्यादींसाठी देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमालेचा, अक्षरमालेचा व अंकांचा शासनाने स्वीकार केला आहे. त्या अनुषंगाने वर्णमालेच्या संदर्भातील स्पष्टीकरणे तसेच विशिष्ट अक्षरांच्या लेखनाबाबतच्या सूचना स्वरचिन्हे, जोडाक्षरे, वर्णक्रम, लेखनात वापरावयाची विरामचिन्हे व अन्य चिन्हे, अंक, अंकांचे अक्षरी लेखन इत्यादीविषयी सविस्तर व सोदाहरण सूचना करण्या आल्या  आहेत. मराठी भाषेच्या लेखनात एकरूपता राखण्यासाठी सर्वांसाठी या सूचना देण्यात आल्या आहेत.

 राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इ. संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. 14 ते दि.28 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.

 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आश्वासक पाऊले उचलली जात आहेत. मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी भाषेचा जागर करण्यात आला. भाषा प्रेम जागृत करणारे विविध उपक्रम यावेळी राज्यभरात आयोजित करण्यात आले होते.  मराठी भाषा ही राज्याचा अभिमान असून तिच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभाग विविध उपक्रमांमधून सातत्याने कार्य करीत आहे व यापुढेही कार्यरत राहील.

अर्चना शंभरकर

०००