सातारा दि. 29 – जिल्ह्याच्या विकासासाठी लागणारा निधी आवश्यक त्या प्रमाणात वितरित करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजना (सर्व साधारण) सन 2023-24 प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील,दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले , जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलिस अधीक्षक समीर शेख,नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या डोंगरी भागातील रस्त्यांच्या विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री जयवंशी यांना करून उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, पर्यटन विकासासह ग्रामीण रस्ते आणि डोंगरी भागातील रस्ते याचा सविस्तर आराखडा सादर करावा.
पालकमंत्री श्री देसाई म्हणाले. जिल्हा हा ८० टक्के डोंगरी आहे. या डोंगरी भागातील रस्ते, पाणी व इतर मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वाढीव निधी मिळावा.
खासदार श्री. पाटील यांनी कोकणातून जिल्ह्याला जोडणारे रस्ते प्रामुख्याने विकसित करावे अशी मागणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यासाठी 2023-24 साठीच्या सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली तसेच आवश्यक त्या वाढीव निधीची मागणी केली.