मुंबई, दि. ३० : “तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर प्रमुख देश म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर अधिक भर द्यावा”, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
कापड उत्पादक असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर मध्ये आयोजित केलेल्या 76 व्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
वस्त्रोद्योग मंत्री श्री.पाटील म्हणाले की, वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी कापूस खरेदी ते कापड निर्मिती असे सर्वसमावेशक नवीन वस्त्रोद्योग धोरण राज्य शासन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करणार आहे. तसेच सहकारी सूत गिरण्यांना प्रति युनिट 3 रुपये प्रमाणे सवलतीस पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईत वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
वस्त्रोद्योग मंत्री श्री.पाटील यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच उद्योजकांशी वस्त्रोद्योगातील अडचणी आणि उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली. याठिकाणी वेगवेगळ्या ब्रँडचे 937 स्टॉल लावण्यात आले आहेत.
यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, कापड उत्पादक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेश मसंद, उपाध्यक्ष राजेश शाह, चेअरमन रोहित मुंजल सचिव संतोष कटारिया, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्री. खरात संबंधित अधिकारी, उद्योजक उपस्थित होते.
000
काशीबाई थोरात/विसंअ/