विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची मतदान केंद्रांना भेट

नागपूर दि. ३०: विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या मतदानावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज येथील मतदान केंद्रांना भेट देत मतदान प्रक्रियेची पाहणी केली.

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी आज दुपारी शहरातील अजनी चौकातील माउंट कार्मेल हायस्कूल तसेच खामला चौकातील ज्युपिटर उच्च प्राथमिक शाळा या मतदान केंद्रांना भेट दिली. या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेची पाहणी करून त्यांनी मतदारांशी संवादही साधला. मतदान केंद्र अधिकारी आणि मतदात्यांना मतदानावेळी काही अडचणी येत आहेत का आदी बाबींची त्यांनी विचारणा केली.

पात्र शिक्षक मतदारांना मतदानासाठी पूर्ण दिवस सुट्टी घोषित करण्यात आली आहे, त्यामुळे सर्व शिक्षकांनी मतदान करावे व मतदानासाठी पूर्ण दिवस सुटीबाबत काही अडचणी असल्यास अशा शाळांची तक्रार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिल्या. मतदान कक्षात मोबाईल व तत्सम वर्जीत गोष्टी नेण्याबाबत काटेकोर पालन होत आहे का याबाबतही त्यांनी तपासणी केली.

000