मुंबई दि. 31 : कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण व बळकटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या 4 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेच्या मार्गावरील सर्व रस्त्यांचा यंदा कायापालट झाल्यामुळे यात्रेला येणाऱ्या भाविकांना याचा लाभ मिळेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच, मोबाईल नेटवर्किंगची समस्या सोडविण्यात आली असून आंगणेवाडी परिसरातील मोबाईल कनेक्टिव्हीटीची सुविधा परिपूर्ण व अद्ययावत करण्यात आली आहे. या परिसरात मोबाईल टॉवर बसविण्यात आले असून 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या भाविकांना मोबाईल कनेक्टिव्हीटीच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी येथे दरवर्षी लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाकरिता येतात. यामध्ये स्थानिक गावकऱ्यांसह मुंबईतून खास भराडी देवी करिता येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचाही समावेश असतो. परंतु, आंगणेवाडी परिसरात मोबाईल नेटवर्क सिग्नल मिळत नसल्यामुळे भाविकांचा या परिसरात मोबाईल कनेक्ट होत नव्हता. भाविकांची ही मुख्य अडचण समजून घेऊन पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरात मोबाईल कंपनीचे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच, या परिसरातील नेटवर्क अधिक चांगले व्हावे या दृष्टीने सुमारे २५ मोबाईल व्हॅन देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे, आंगणेवाडी यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांना यंदा “नो-नेटवर्क” असलेल्या या परिसरात आता मोबाईल नेटवर्कची सुलभता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, आंगणेवाडी साठी येणाऱ्या भाविकांना यात्रेची छायाचित्रे, व्हीडीओ काढण्याचा आनंद मिळणार आहे, असा विश्वास मंत्री श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
*****
संध्या गरवारे/विसंअ/