मुंबई, दि. १ : बचतगटांच्या माध्यमातून महिला उत्कृष्ट काम करत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी महिलांचे योगदान आणि सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आजपासून राज्यात सुरू होणाऱ्या जेंडर ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम (जीटीएम) उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी मदतच होणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राजभवन येथे आज महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) राबवित असलेल्या नव तेजस्विनी ‘जेंडर ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझमच्या अंमलबजावणी उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम आयफॅडच्या विशेषतज्ञ नदिया बेल्टचिका, जी टी एम च्या भारत प्रमुख मीरा मिश्रा, आयफॅडचे रोम, इटली व भारतातील प्रतिनिधी तसेच बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रतिनिधी व वॉशिंग्टन विद्यापीठातील, सनियंत्रण आणि मूल्यमापन तज्ज्ञ, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट आणि बिल अॅण्ड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या माध्यमातून राज्यात राबविण्यात येणारा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ उत्कृष्टपणे राबवेल. आगामी सहा वर्षात या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड शंभर टक्के होते. त्यामुळे बँका देखील त्यांना कर्ज देण्यासाठी उत्सुक असतात. महिलांच्या विकासासाठी जागतिक स्तरावरून होत असलेले सहकार्य देखील महत्त्वाचे आहे. शासनाकडून देखील महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम व योजना राबवल्या जातात. कोणत्याही योजनेचा लाभार्थी असेल त्याला अनुदान देताना थेट ग्राहकांच्या खात्यात दिले जाते.
महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. साहजिकच महिलांचे विकासात योगदान वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही देशाची प्रगती आहे. आज बचत गट काम करताना व्यापक स्वरूपात काम करू शकतात. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष म्हणून जाहीर केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात पौष्टिक तृणधान्यांना आरोग्यविषयक महत्त्व व आहारातील वापर वाढवण्याकरता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन महिला बचत गटानेदेखील पौष्टिक तृणधान्य या संस्कृतीला पुढे नेणे गरजेचे आहे, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.
आयफेडचे ग्रामविकासात महत्त्वाचे योगदान : नदिया बेल्टचिका
ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम आयफॅडच्या विशेषतज्ञ नदिया बेल्टचिका म्हणाल्या की,इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंटचे ग्राम विकासामध्ये खूप मोठे योगदान आहे. ‘जीटीएम’ साठी निवड करण्यात आलेल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश आहे. जीटीएम या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात आगामी सहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येईल.
जीटीएम या उपक्रमासाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य – प्रधान सचिव आय. ए. कुंदन
महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन म्हणाल्या की, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट आणि बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने जीटीएमया उपक्रमासाठी सहा वर्षासाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. जीटीएमच्या उपक्रमाची अंमलबजावणी वर्ष २०२३-२४ पासून सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्राने लीड राज्य म्हणून राष्ट्रीय स्तरावर ‘माविम’ने केलेल्या कामांच्या यशोगाथांचे सादरीकरण केले. माविम ने आपल्या कार्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला बचत गटांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन सक्षमीकरण करणे, ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी महिला बाल विकास विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांनी केले.
0000
संध्या गरवारे/विसंअ/