तरुणांनी कंपनीसाठीचे ज्ञान आत्मसात करुन भविष्यात मोठा उद्योगपती होण्याच्या दिशेने वाटचाल करावी- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

          जालना, दि. 17 (जिमाका) :- आपल्या  देशात केवळ मनुष्यबळाची कमतरता नसून कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्राला उणीव भासत आहे. त्यामुळे तरुणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून  कुशल मनुष्यबळ कसे मिळविता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच एखाद्या औद्योगिक कंपनीत कुठल्याही पदावर काम करत असताना त्या कंपनीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे ज्ञान आत्मसात करुन भविष्यात मोठा उद्योगपती  होण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

जालना येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या व बदनापूर येथील कै.तिलोकचंद कुचे  शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रावसाहेब पाटील दानवे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा आज  संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, बदनापुरचे नगराध्यक्ष जगनराव बारगजे,  माजी आमदार गोविंदराव केंद्रे, औरंगाबाद विभागाचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता उपआयुक्त सुनिल सैंदाणे, जालना येथील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे, योगेश जोशी,  देविदास कुचे, श्रीमती शीतल कुचे, भिमराव  डोंगरे, भाऊसाहेब घुगे, वसंत जगताप, भगवान म्हात्रे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, उमेदवारांनी सर्व परिस्थितीचा सर्वप्रथम अभ्यास करुन विभागीय रोजगार मेळाव्यातून नोकरी निवडावी. उमेदवाराच्या कौशल्यावर या मेळाव्यातून नोकरी मिळणार असल्याने आपली निवड न झाल्यास खचून न जाता नव्याने पुन्हा तयारीला लागून पुढील रोजगार मेळाव्यात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.  उमेदवारांनी सुरुवात करतांना प्रथम कनिष्ठ पातळीवरील पदावरुन करावी. नंतर टप्प्याटप्प्याने एक एक पायरी चढत जात यश प्राप्त  करत रहावे. आपल्या शहर परिसरातील उद्योगधंद्यांचा अभ्यास करुन त्या-त्या  क्षेत्रातील योग्यतेची पात्रता संपादन करावी. जेणेकरुन आपल्या आवडत्या परिसरात  आपल्याला नोकरीची संधी प्राप्त होवू शकेल. अकुशल माणसांना कुशल होण्यासाठी बराच काळाचा अनुभव घ्यावा लागतो. सर्वात अगोदर क्षेत्र निवडावे व ज्या क्षेत्रात कार्यरत असाल त्यात सर्वस्व अर्पण करुन  काम करावे. कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते, त्यामुळे संयम ठेवून काम करा म्हणजे यश हमखास मिळेल.  परदेशात भारतीय तरुणांना आपल्या शिक्षणाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळत आहेत त्यामुळे आपल्या गावाचा लोभ सोडा, घराबाहेर पडून नोकरी करा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

आपला देश हा तरुणांचा देश असून आपली लोकसंख्या ही संपत्ती झाली पाहीजे, या दिशेने वाटचाल करावी. नोकरी करत असतांना प्रामाणिकपणे करा ते जमत नसेल तर शेती करावी, असे सांगून शासनाच्या ‍विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेवून कर्ज उपलब्धतेतून व्यवसाय सुरु करुनही आपण प्रगती साधू शकतो. तरुणपणी अभ्यास करा, कष्ट करा आणि मेहनत घ्यावी  म्हणजे तुमचा भविष्यातील काळ हा उज्वल होईल, त्यामुळे तरुणपण कामासाठी वापरावे म्हणजे नंतर वय  व अनुभव झाल्यावर देशभ्रमंती करता येईल.

विभागीय रोजगार मेळाव्यात आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, औरंगाबाद विभागाचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता उपआयुक्त सुनिल सैंदाणे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संपत चाटे यांनी केले तर आभार कौशल्य विकास अधिकारी सुरेश बहुरे यांनी मानले. सुत्रसंचालन राजु थिटे यांनी केले.  कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाली. या कार्यक्रमास पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, विविध कंपनींचे प्रतिनिधी, सुशिक्षीत बेरोजगार उमेदवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आत्मराम दळवी, कैलास काळे, अमोल बोरकर, प्रदीप डोळे, वीरेंद्र चव्हाण, गजानन खोकड, राजू कटके, जयदत्त इंगोले, मधुकर खेडकर, सुरेश शेळके यांनी परिश्रम घेतले.