मराठी भाषा गौरवदिनी ३५ पुस्तकांचे होणार प्रकाशन

0
7

मुंबई, दि. २४ : वर्षभरात सिद्ध झालेल्या नव्या ३५ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी दि. २७ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पुस्तक प्रकाशन हे मुख्य उद्दिष्ट असून साहित्य, संस्कृती, कला, इतिहास या विषयांवरील वैचारिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक, वाङमयीन संशोधनात्मक असे वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण व दुर्मिळ स्वरूपाचे महत्त्वपूर्ण ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केले जातात. मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने आतापर्यंत ६४७ ग्रंथ प्रकाशित केले असून, मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे.

यावर्षीदेखील अत्यंत मौलिक अशा या ३५ ग्रंथांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय दुर्मिळ झालेला ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन (भाग पहिला) दर्शन प्रवेश व साहित्य खंड व ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ (भाग दुसरा) अध्यात्म खंड व शास्त्रीयादि विषय हा दोन खंडातील ग्रंथ ८८ नंतर मंडळाकडून पुर्नप्रकाशित करण्यात येत आहे. संत साहित्याच्या अभ्यासातील दीपस्तंभ ठरलेल्या प्रस्तुत ग्रंथाने संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचे अपूर्व दर्शन घडविले आहे.

याबरोबरच श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङमय चार खंडात प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने हाती घेतला असून या प्रकल्पाचे संपादन डॉ. विश्वास पाटील यांनी केले आहे. सदर  प्रकल्पातील ‘श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्मय खंड १ गीता सत्त्वबोध: कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग व श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङमय खंड  पातंजल योग दर्शन व ब्रह्मसूत्र शांकरभाष्य विवेचन (चार अध्याय)’ हे दोन खंड मंडळाकडून प्रकाशित करण्यात येत आहेत. या ग्रंथांच्या निमित्ताने श्री बाळकोबा भावे यांची ग्रंथसंपदा एकत्रित स्वरुपात वाचकांसमोर येत आहे.

आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांचे आणि त्यांच्या कवितांचे अंतरंग समीक्षकाच्या निकोप दृष्टीने उलगडून दाखविण्याचे काम थोर समीक्षक व. दि. कुलकर्णी लिखित ‘केशवसुतांचे अंतरंग’ या पुस्तकात केले असून हा ग्रंथ मंडळाच्यावतीने वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. निसर्ग आणि पर्यावरणविषयक पारिभाषिक संज्ञा-संकल्पनांचे संकलन आणि विश्लेषण करणारा ‘पर्यावरणाच्या परिघात निसर्ग-पर्यावरणाच्या संज्ञा-संकल्पनांचा परिचय आणि विश्लेषण हा ग्रंथ वर्षा गजेंद्रगडकर यांनी लिहिला असून तो मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित होत आहे. महानुभावांच्या साहित्यातील गुप्त लिप्यांमध्ये लिहिलेले ग्रंथ मराठी भाषेच्या इतिहासातील मौलिक ठेवा आहेत.

महानुभावांच्या तीन सांकेतिक लिप्यांच्या समृद्ध वारशाचा परिचय मराठीजनांना करुन देणारा प्रकल्प मंडळाने राबविला असून या प्रकल्पांतर्गत विनायक त्र्यंबक पाटील यांनी लिप्यंतर केलेल्या ‘महानुभाव सांकेतिक वज्र लिपी (पोथींसह लिप्यंतर) व महानुभाव सांकेतिक कवीश्वरी लिपी (पोथीसह लिप्यंतर) या दोन ग्रंथांचा समावेश मंडळाकडून प्रकाशित होत असलेल्या सदर ३५ ग्रंथामध्ये आहे. यासोबतच होळकरशाहीचा समग्र इतिहास अकरा खंडातून प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने हाती घेतला असून या प्रकल्पातील पहिले पाच खंड यापूर्वीच मंडळाकडून प्रकाशित करण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे संपादन डॉ. देवीदास पोटे यांनी केले असून सदर प्रकल्पातील पुढील खंड सहा ते खंड दहा हे पाच खंड मंडळाकडून प्रकाशित होत आहेत. होळकर राजघराण्याच्या हकीकतीसंबंधीचा इ.स. १६९३ ते इ.स. १८८६ पर्यंतचा इतिहास असलेला ‘होळकरांची कैफियत (खंड ६) हा ग्रंथ. तसेच होळकर रियासतीच्या संपन्न आणि बहुआयामी सांस्कृतिक परंपरेचा सर्वांगीण वेध घेणारा ‘होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास’ (खंड ७) हा ग्रंथ, तसेच मध्य भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या अहिल्याबाई होळकर यांची गौरवगाथा विविध मान्यवरांच्या लेखणीतून मांडणारा, अखिल मानवजातीला सतत प्रेरणा देणारा ‘अहिल्याबाई होळकर गौरवगाथा लोकमातेची’ (खंड ८) हा ग्रंथ होळकरशाहीतील सुभेदार मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर व यशवंतराव होळकर या तीन प्रमुख राज्यकत्यांच्या चरित्र आणि कर्तृत्वाचा वेध घेणाच्या काव्याचा होळकर रियासत काव्यायान (खंड ९) हा संकलनात्मक ग्रंथ, इंदूरच्या होळकर राज्याचे संस्थापक व मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ असलेले शूरवीर मल्हाररावांचे सुभेदार थोरले मल्हारराव होळकर’ (खंड १०) हे चरित्रपर पुस्तक असे पाच खंड मंडळाकडून प्रकाशित होत असून इतिहासाच्या अभ्यासकांना व वाचकांना ते उपयुक्त आणि प्रेरणादायी आहेत.

गौतमीमाहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास’ हा त्रिखंडात्मक प्रकल्प मंडळाच्यावतीने राबविण्यात आला असून सदर प्रकल्पातील डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी संपादित केलेला गौतमीमाहात्म्य’ हा पहिला भाग मंडळ प्रकाशित करीत आहे. ‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ श्री. इब्राहिम अफगाण यांनी लिहिला असून हा ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे. ललित लेखनकलेत समाविष्ट असलेले, संशोधन झालेले आणि प्राचीन ते आधुनिक दृष्टीकोनांचा, साधनांचा अंतर्भाव असलेली समस्त साधने मराठीतील लेखक तसेच अभ्यासकांना एका ग्रंथाद्वारे उपलब्ध करण्याची गरज या ग्रंथाद्वारे पूर्णत्वास जात आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात प्रकाशित झालेले व सध्या अतिशय दुर्मिळ असलेले ‘दुर्मिळ चरित्रे खंड १ संपतराव गायकवाड’, ‘केशवराव देशपांडे, रामचंद्रराव माने पाटील, दुर्मिळ चरित्रे खंड २’ विश्वनाथ नारायण मंडलिक भाग-१ व दुर्मिळ चरित्रे खंड २ विश्वनाथ नारायण मंडलिक भाग-२ हे प्रा. राजेंद्र मगर यांनी संपादित केलेले ग्रंथ याबरोबरच श्री. यमाजी मालकर यांनी संपादित केलेले ‘दानशूर महाराजा सयाजीराव’ व ‘महाराणी जमनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र’ हे ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित होत आहेत.

डॉ. वसु भारद्वाज यांनी संपादित केलेले पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि विचारदर्शन खंड १’, ‘तत्त्वज्ञान आणि नीती खंड २, व ‘नीतीतत्त्वज्ञान राजकीय आणि सामाजिक खंड ३’, हे तीन खंड प्रकाशित करण्यात येत असून या तीनच्या माध्यमातून केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक तत्वज्ञानाचा परामर्श घेतला गेला आहे. या त्रिखंडात्मक ग्रंथाच्या निमित्ताने अभ्यासकासाठी एक मोठा संदर्भवन उपलब्ध होत आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार या चरित्रमालेअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे चरित्र मंडळाकडून पुनर्मुद्रित करण्यात आले आहे. तसेच ‘कृषी संवादक महात्मा फुले’ हे पुस्तकही मंडळाकडून पुर्नमुद्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान म्हणजे आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे जीवनचरित्र श्री. आसराम कसबे यांनी लिहिले असून मंडळाच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ योजनेअंतर्गत ते प्रकाशित होत आहे. याबरोबर इब्राहीम अफगाण लिखित हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारे, त्यांचे कार्य व योगदान मांडणारे ‘महाराष्ट्राचे शिल्पकार हुतात्मा वीर माई कोतवाल हे चरित्रपर पुस्तक मंडळ प्रकाशित करीत आहे. या चरित्रपर पुस्तकांच्या माध्यमातून काळाच्या पडद्याआड दडलेल्या प्रेरणादायी इतिहासाचे सुवर्णपान वाचकांपर्यंत पोहोचत आहे.

याबरोबरच यावर्षीचा विंदा जीवनगौरव पुरस्कार ज्यांना प्रदान केला जाणार आहे असे ज्येष्ठ लेखक प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी लिहिलेले लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची जीवनगाथा गाणारे ‘महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव हे चरित्रपर पुस्तक मंडळाकडून पुनर्मुद्रित करण्यात आले आहे. याबरोबरच मंडळाच्यावतीने यापूर्वी प्रकाशित झालेला गणित तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणारा ‘गणिती तत्त्वज्ञानाचा परिचय’ हा ग्रंथ, विज्ञान आणि काव्य यांचे संकल्पन मांडणारा, काव्याचे स्वरुप, महत्त्व व कार्य काय आहे, याची चर्चा करणारा ‘काव्ये आणि विज्ञाने’ हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून मंडळ प्रकाशित करीत आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची व कार्याची ओळख करून देणारा ‘यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व’ हा त्यांच्यावरील स्मृतिग्रंथ पुनर्मुद्रित करण्यात आला आहे.

संगीत विषयाची मौलिक माहिती देणारा ‘संगीत आणि कल्पकता’ हा ग्रंथ, देकार्तची ज्ञानमीमांसा व तत्त्वज्ञानाच्या स्वरुपातील विचार मांडणारा ‘देकार्तची चितने’ हा ग्रंथ पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. याबरोबरच ‘लैंगिक नीती आणि समाज’ व सातारचे प्रतिसरकार स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती या पुनर्मुद्रित ग्रंथाचे प्रकाशन देखील मराठी भाषा गौरव दिनी मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

000

अर्चना शंभरकर/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here