मनाचा दृष्टिकोन विशाल ठेवल्यास तणाव निवळण्यास मदत – श्री श्री रविशंकर

मुंबई, दि. २४ : शासन सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा असतात. त्यातच दैनंदिन कामकाजामुळे येणारा ताण – तणाव निवळण्यासाठी मनाचा दृष्टिकोन विशाल ठेवून जीवन जगण्याची कला आत्मसात केल्यास तणाव निश्चित कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी आज येथे केले.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावर यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शासकीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे आदी उपस्थित होते.

श्री श्री रविशंकर म्हणाले की, ताण- तणावामुळे दैनंदिन जीवन प्रभावित होऊन कौटुंबिक समस्या वाढतात. तणावामुळे मन संकुचित होते. त्याचा विपरित परिणाम कामकाजावर होतो. त्यातूनच काही वेळेस अनुचित सवयी लागतात. त्यामुळे ताण- तणाव कमी न होता ते वाढतातच. अशा परिस्थितीत प्रत्येकाने जीवन जगण्याची कला शिकली पाहिजे. थकलेले मन आणि शरीराला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी झोपेबरोबरच आपल्या श्वसन क्रियेवर लक्ष देवून त्यांचे काही व्यायाम नियमितपणे केले पाहिजेत. त्याचे सकारात्मक परिणाम अल्पावधीतच दिसून येतील.

श्वसन क्रियेचे व्यायाम, नियमित ध्यानधारणा यामुळे शारीरिक व मानसिक ताण- तणाव कमी होण्यास मदत होते. म्हणून श्वसन क्रिया आणि प्राणायाम नियमितपणे करावा. तसेच मन निकोप ठेवावे, असेही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव म्हणाले की, अलीकडे ताण – तणावाला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनामुळे अधिकारी आणि कर्माचाऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अपर मुख्य सचिव श्री. गद्रे यांनी आभार मानले. यावेळी राज्य शासनाच्या सेवेतील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००

गोपाळ साळुंखे/स.सं