महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

नवी दिल्ली ,२७ : महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या ग्रंथालयात कवी ‘कुसुमाग्रज’ यांच्या प्रतिमेस जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

शासनाच्यावतीने ‘कुसुमाग्रज’ यांची जयंती ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरी केली जाते.  यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर व उ‍पस्थित कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.

‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘कुसुमाग्रज’

कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्‍कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान  आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या नावाने त्यांनी काव्य लेखन केले. प्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या नंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक होते.

कवी कुसुमाग्रज यांचे एकूण २४ कविता संग्रह , ३ कादंबऱ्या, १६ कथा संग्रह, १९ नाटके आणि ४ लेखसंग्रह आदी साहित्य प्रसिद्ध आहे. १९६४ मध्ये  गोव्यात आयोजित ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट’  या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.

०००