मुंबई, दि. 08 : समाजाला विषारी विचारांपासून वाचविण्याची जबाबदारी चित्रपटसृष्टीची आहे, दर्जेदार आणि आशयघन चित्रपट निर्मितीतून चित्रपटसृष्टीने ती पूर्ण करावी. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आज मंत्रालयात दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेंतर्गत 41 मराठी चित्रपटांना 12 कोटी 71 लाख रुपये अनुदान वाटपाचा कार्यक्रम मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे, सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह प्रसिद्ध चित्रपट कलावंत जॅकी श्रॉफ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
याप्रसंगी श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले कि, मराठी चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी पूरक आणि पोषण निर्णय घेतले जात असून दर्जेदार आणि आशयघन मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. राज्य सरकार चित्रपटांच्या निर्मितीला बळ देण्यासाठी पाठीशी उभे आहे. राज्यात जास्तीत जास्त चित्रपट तयार व्हावेत आणि ते चित्रपटगृहांमध्ये उत्तम चालावेत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यादृष्टीने राज्यातील नाट्यगृहे ही नाट्यचित्र मंदिर करता येतील का आणि तेथे दिवसभराच्या वेळेत चित्रपट प्रसारित करता येतील का, याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या आपण राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे अनुदान दुप्पट करण्याचा निर्णय घेत आहोत. चित्रपटासाठी देण्यात येणारे अनुदान ३ महिन्याच्या आत देण्याची सूचना विभागाला केली आहे. अधिकाधिक आशयसंपन्न चित्रपट निर्मिती मराठीमधून व्हावी, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. कोल्हापूर येथील चित्रनगरीचा विकास त्यादृष्टीने आपण करत आहोत, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. मागील दोन महिन्यापूर्वी 15 सदस्यांची चित्रपट परीक्षण समिती राज्य शासनाने गठीत केली. चित्रपट क्षेत्रातील जाणकार, तज्ज्ञ मंडळींचा त्यामध्ये समावेश केला आहे. त्यामुळे पारदर्शी पद्धतीने जलदगतीने चित्रपटांचे परीक्षण होऊन अनुदान पात्र चित्रपटांना अनुदानाची कार्यवाही पूर्ण होईल, असे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्री.श्रॉफ यांनी मराठीमध्ये अनेक गुणी कलाकार असून मराठी मध्ये दर्जेदार चित्रपटनिर्मिती होत असल्याचे सांगितले.
प्रधान सचिव श्री. खारगे यांनी मराठी भाषेत अधिकाधिक अ वर्ग दर्जाचे चित्रपट तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आव्हानांना संधीत रुपांतरीत करण्याचे काम चित्रपट निर्मात्यांसोबतच राज्य शासन करणार असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ढाकणे यांनी प्रास्ताविक केले तर यावेळी चित्रपट निर्मात्यांच्या वतीने श्रीरंग गोडबोले, प्रमोद पवार आणि संतोष पोटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वच निर्मात्यांनी त्यांच्या मनोगतातून अनुदान वाटपाच्या केलेल्या कार्यवाहीबाबत राज्य शासनाचे आभार मानले.
यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते चित्रपट निर्मात्यांना अनुदान वाटप करण्यात आले. यामध्ये ०४ चित्रपटांना “अ” दर्जा तर “३३” चित्रपटांना “ब” दर्जा प्राप्त झाला आहे. तर ०४ (मुरंबा, बंदीशाळा,पितृऋण,भोंगा) चित्रपट विविध राज्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांना शासन धोरणानुसार अ दर्जा देऊन अनुदान वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. खैरे यांनी आभार मानले.
शिवराज्याभिषेकाच्या अर्धत्रिशतसांवत्सरिक महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनीही आपल्या सूचना द्याव्या असे आवाहनही सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
0000
वर्षा आंधळे/विसंअ/