मुंबई, दि. 8 : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषणने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्यावरील वैद्यकीय उपचाराच्या खर्चापोटी तीन लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णालयाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या होत्या.
सुलोचनादीदी (९४) या श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे आजारी असून दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या आजारपणाविषयी माहिती कळल्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांच्या परिवाराजवळ चौकशी केली तसेच तातडीने उपचारासाठीचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याच्या सूचना दिल्या होत्या.