विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
9

लोककलावंतांना मानधन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रचलित कला आणि कलावंतांची संख्या विचारात घेणार -मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ९ – महाराष्ट्रात लोककलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोक कलावंतांच्या समस्यांबाबत सर्वंकष निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल विभागास नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालातील निष्कर्ष तपासून प्रत्येक जिल्ह्यात जपली जात असलेली कला आणि कलावंत यांची तर्कावर आधारित संख्या विचारत घेऊन मानधन देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात कलावंतांना अ गटासाठी ३१५० रूपये, ब गटासाठी २७०० रूपये तर क गटासाठी २२५० रूपये इतका सन्मान निधी देण्यात येतो. इतर राज्यांपेक्षा हा निधी जास्त आहे. तथापि याबाबत आणखी वाढ करता येईल का याबाबत अहवालातील निष्कर्ष तपासून निर्णय घेण्यात येईल. कलावंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीलाही सन्मान निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध निवृत्ती वेतन योजनांसाठी वय मर्यादा ६० वर्षांहून अधिक आहे. तथापि राज्यात कलावंतांसाठी ही मर्यादा ५० वर्ष ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कलावंतांची सविस्तर माहिती एकत्रित असावी यासाठी पोर्टल तयार करण्यात येत असून निवृत्तीच्या वेळी याचा उपयोग होईल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. कलावंतांचे जानेवारी २०२३ पर्यंतचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, सचिन अहिर, विलास पोतनीस, सतेज पाटील, अभिजित वंजारी, श्रीमती उमा खापरे आदींनी सहभाग घेतला.

00000

बी.सी.झंवर /विसंअ

जालना येथे बियाणे पार्क उभारताना लहान कंपन्यांनाही प्रोत्साहन देणार – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 9 : “राज्यात बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जालना येथे बियाणे पार्क उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध आहे. याअंतर्गत लहान कंपन्यांना सुद्धा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने कृषी विभागाच्या जागेवर सवलतीच्या दरात जागा देता येईल का, याबाबत विचार करणार” असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, जालना येथे बियाणे पार्क उभारण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात देखील बियाणे पार्क उभारण्याबाबत समिती स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

यासंदर्भात झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,  सदस्य ॲड. मनीषा कायंदे, वजाहत मिर्झा आदींनी सहभाग घेतला.

00000

बी.सी.झंवर/विंसअ/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here