‘आरे’साठी सर्वंकष विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येईल – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 10 : गोरेगाव येथील आरे कॉलनीच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य रवींद्र वायकर, सुनील राणे यांनी ‘आरे’च्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, आरे वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यांचे डांबरीकरण न करता काँक्रिटीकरण करण्यात येईल. ‘आरे’ हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांतर्गत येत असल्याने या भागाचा विकास करताना पर्यावरण विभागाची परवानगी असणे आवश्यक आहे.
गोरेगाव चेकनाका येथे उभारण्यात येत असलेल्या प्रवेशद्वाराचे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र याबाबतचा प्रस्ताव का प्रलंबित आहे हे तपासून पाहण्यात येईल. आरे परिसरात अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या नागरिकांना हटविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत समिती गठित करण्यात येईल. ‘आरे’ येथील तलावांमधील गाळ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून काढण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
आरे वसाहतीत होणारे निष्कासन रोखण्यासाठी आरे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने सातत्याने निष्कासनाची कारवाई करण्यात येते. आरे वसाहत ही केंद्र शासनाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनक्षम क्षेत्र म्हणून घोषित केल्याने आरे वसाहतीतील पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण करण्यासाठी असणाऱ्या मर्यादा विचारात घेऊन आरे दुग्ध वसाहतीच्या सुशोभीकरणासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करुन सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही श्री. विखे – पाटील यांनी सांगितले.
०००
वर्षा आंधळे/विसंअ/
‘अस्मिता’ योजना पुन्हा सुरू करणार – मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 10 : ‘अस्मिता’ योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. लवकरच ही योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्या नमिता मुंदडा यांनी राज्यात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या अस्मिता योजनेच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात आली. महिलांच्या आरोग्याचा दृष्टीने ही महत्त्वाची योजना आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या योजनेत महिला व किशोरवयीन मुलींना एक रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची प्रक्रिया सुलभ पद्धतीने करण्यासाठी सर्व महिला आमदारांसोबत अधिवेशन काळात बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्या प्रा. वर्षा गायकवाड, डॉ. भारती लव्हेकर, सुलभा खोडके, यामिनी जाधव, सदस्य हसन मुश्रीफ, राजेश टोपे यांनी सहभाग घेतला.
***
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते सिमेंटचे करणार – मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 10 : राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत येणारे रस्ते सिमेंटचे करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य सुनील राणे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत केलेल्या कामांचे कंत्राटदारांकडून वस्तू व सेवाकराची रक्कम कपात न केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री.महाजन म्हणाले की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या कामाबाबत संबंधित कंत्राटदाराचे अंतिम देयक अदा करताना नियमानुसार वस्तू व सेवाकराची कपात करून कंत्राटदाराला देयके अदा केली जातात. कंत्राटदारांना काम देण्याअगोदर त्यांची बीड कॅपॅसिटी किती आहे हे तपासली जाते.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, प्रशांत बंब, आशिष जयस्वाल यांनी सहभाग घेतला.
०००००
लांजा ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
मुंबई, दि 10 : ग्रामीण रुग्णालय लांजा येथे 28 मंजूर पदांपैकी 21 पदे भरण्यात आलेली असून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, ग्रामीण रुग्णालय लांजा येथील अधीक्षक पद रिक्त आहे. याबाबत विभागामार्फत चौकशी करून अहवाल मागविण्यात येईल. राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अशोक चव्हाण, अनिल देशमुख, शेखर निकम, राम सातपुते, आदिती तटकरे, देवयानी फरांदे यांनी सहभाग घेतला.
000
शैलजा पाटील /व.स.अ