सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई दि. 10 : सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम लवकर पूर्ण होण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात सिंधुदुर्ग येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उप सचिव प्रकाश सुरवसे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव श्री.तेलंग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती नाईक, सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. गुरव, कार्यकारी अभियंता श्री. सर्वगोडे उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, सन 2021-22 पासून जिल्हा रुग्णालयातील विविध इमारतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि वसतीगृह कार्यरत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या 29 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग येथे 100 विद्यार्थी क्षमता आणि 500 खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. इमारतीच्या बांधकामासाठी 427.57 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय सन 2022-23 च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे 43 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रथम 15 हजार चौ.मी. जमिनीवर अनुज्ञेय टप्पा 1 चे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच टप्पा 2 बाबत आवश्यक ती कार्यवाही करून बांधकाम सुरू करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी केल्या.

००००

वर्षा आंधळे/विसंअ