अहमदनगर, दि. ११ (विमाका वृत्तसेवा) – कर्जत येथील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नवीन बांधकाम केलेल्या ३८ निवासस्थानांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जत येथे करण्यात आले. तसेच जामखेड येथील ३८ निवासस्थानांचे कर्जत येथून ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.
यावेळी महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार राम शिंदे, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस उप महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते .
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कर्जत येथील या नवीन पोलीस निवासस्थांनाची पाहणी केली. पोलीस कर्मचारी व बॅंड पथकातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
कर्जत येथे ३०२३.१५ व जामखेड येथे २९९६.३१ चौरस मीटर मध्ये पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७६ निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. कर्जत येथे ३८ व जामखेड येथे ३८ निवासस्थाने एकूण १५ कोटी २१ लाख रुपये खर्चून बांधण्यात आली आहेत.
या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पोलिस नाईक संभाजी वाबळे व पोलीस शिपाई ईश्वर माने यांना २ बीएचके सदनिकेच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या अधीक्षक अभियंता अनिता परदेशी, उप अभियंता विजय भंगाळे, प्रकल्प अभियंता सागर सगळे, कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित, जयंत कोलते, हर्षद सारडा व रविंद्र पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या देऊळवाडी (ता.कर्जत) येथील ४००/२२० के.व्ही.केंद्राचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते यावेळी ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.