महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

पुणे दि. १२ :  पुणे महानगरपालिकेच्यावतीने कै. नथुजी दगडू मेंगडे जलतरण तलाव व व्यायामशाळा, कर्वेनगर येथे महिला दिनानिमित्त आयोजित महिला बचत गटांच्या प्रदर्शन आणि विक्री स्टॉलला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  भेट देवून पाहणी केली. यावेळी महानगरपालिकेचे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, सुशील मेंगडे आदी उपस्थित होते.

यावेळी  पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन भरविले जाते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटी च्या प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. कोथरूड मध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी मोफत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी यांच्या सामाजिक दायित्व निधीतून समर्थ युवा फाऊंडेशन या संस्थेला देण्यात आलेल्या मोबाईल मेडिकल वाहनाचे लोकार्पण करण्यात  आले.

         विविध विकास कामांचे भूमिपूजन

तत्पूर्वी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत सागर कॉलनी शास्त्रीनगर येथे १ कोटी ८० लाख व कर्वेनगर येथील मावळे कॉलनी येथे २ कोटी ५४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन  झाले. यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगितले.

 

०००