कुलाबा तालुका क्रीडांगणाचे काम गतीने पूर्ण करावे – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबई, दि. १३ : कुलाबा परिसरासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कुलाबा तालुका क्रीडांगणाचे काम गतीने पूर्ण करावे, असे निर्देश विधानसभा ॲड. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

कुलाबा तालुका क्रीडांगण कफ परेड येथे प्रस्तावित आहे. या प्रस्तावित तालुका क्रीडांगणाच्या कामकाजाबाबत विधानभवन येथे आयोजित बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री गिरीश महाजन, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, कुलाबा तालुका क्रीडांगणाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे. दर्जेदार क्रीडांगण निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. हे क्रीडांगण कुलाबा परिसरातील नागरिक, युवा खेळाडूंसाठी महत्त्वाचे केंद्र असणार आहे. कुलाबा परिसरातील नामांकित खेळाडू या क्रीडांगणामुळे उदयाला येतील. या क्रीडांगणामुळे कुलाबा परिसराच्या वैभवात भर पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी क्रीडांगणाच्या उभारणीबाबतच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

000

राजू धोत्रे/विसंअ