ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई, दि १६ :- ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी ह्युंदाई मोटर्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉसिक थाॅमस किम, जनरल मोटर्सचे कॉर्पोरेट विकास संचालक जोसेफ उर्सो, जनरल मोटर्सचे ग्लोबल पब्लिक पॉलिसी संचालक, श्री. थॉमस कारगिल, जनरल मोटर्सचे उपाध्यक्ष, (मॅन्युफॅक्चरिंग), श्री असिफहुसेन खत्री,
कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे. उद्योगांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे. सर्व संबंधित विभाग आणि यंत्रणांमार्फत उद्योगांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

ह्युंदाईचे कार्यकारी अध्यक्ष डॉसिक थाॅमस किम म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था बळकट असून महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी तसेच विस्तारासाठी मोठ्या संधी आहेत. सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रात भारतात कंपनीमार्फत भरीव काम करण्यात येत असून आगामी प्रकल्प नवीन तंत्रज्ञानावर आधारित असतील असे किम यांनी सांगितले.

जनरल मोटर्सचे कॉर्पोरेट विकास संचालक जोसेफ उर्सो म्हणाले, महाराष्ट्रात उद्योग उभारणीचा आणि उद्योग क्षेत्रात काम करण्याचा अनुभव अतिशय सुखद आहे. उद्योग उभारणी आणि विस्तार करताना कामगारांच्या हिताचा पूर्णपणे विचार करण्यात येईल अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

000