महिला बचत गटांच्या उत्पादनांचे ब्रॅंडिंग करावे – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर/पंढरपूर दि. 19 (जि. मा. का. ) : महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या उत्पादनांचे महिलांनी ब्रॅंडिंग करावे. ऑनलाईन विक्रीसाठी प्रयत्न करावा. या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा घेणे गरजेचे असून, आपण त्यासाठी सोलापूर येथे जागा व आर्थिक तरतूद करू, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व महिला दिनाचे औचित्य साधून महिला आर्थिक विकास महामंडळ, शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट व डॉटर मॉम्स फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नव उद्योजक महिला, महिला बचत गट कर्जवितरण, बाल आहार व महिला आरोग्य विषयी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, मदनसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महिला बचत गटाच्या माध्यमातून सहकार चळवळीला गती येत असून आपण नगर जिल्ह्यात व मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यात ही चळवळ गतीमान केली. या चळवळीला गती देण्यासाठी आपण आवश्यक सहकार्य करु. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी सोलापूर येथे मॉलसाठी जागा व निधीही उपलब्ध करुन देवू, असे ते म्हणाले. पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी माजी सभापती वैष्णवीदेवी व शीतलदेवी मोहिते पाटील यांचे यावेळी कौतुक करून शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट व डॉटर मॉम्स फाउंडेशनने महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी अवकाळी पावसाने व गारपीटीमुळे तालुक्यातील हजारो एकर क्षेत्र बाधित झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली. प्रास्ताविकात माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांनी तालुक्यात ३६०० बचत गट असून ३९ हजार महिला कार्यरत असल्याचे सांगितले. या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी तालुकास्तरावर निवासी प्रशिक्षण केंद्र सुरु करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या समारंभात विविध स्पर्धातील यशस्वी स्पर्धक व महिला बचत गटानाधनादेश वितरण पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले .

या समारंभास धैर्यशील मोहिते पाटील , माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील पाटील, सोमनाथ लामगुंडे, रणजित शेंडे, बाबाराजे देशमुख, सोमनाथ भोसले,, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, शीतलदेवी मोहिते ॲड. मिलिंद कुलकर्णी, ॲड. प्रकाश पाटील, माजी सभापती शोभाताई साठे, उपसभापती प्रताप पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

000