विधानसभा प्रश्नोत्तरे

मुंबईत नदी परिसरात असलेल्या गोठ्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 21 : मुंबईतील गोठे हलविण्याचा निर्णय सध्या न्यायप्रविष्ट असून याबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. नदी परिसरात असलेल्या गोठ्यातील शेण व  सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 19 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एस.टी.पी. ) काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईतील व दहिसर, ओशिवरा, पोईसरसह मिठी नदी परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. एस.टी.पी. प्लांट मुळे प्रक्रिया करून पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. यामुळे नद्या प्रदूषणमुक्त होतील.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य योगेश सागर, छगन भुजबळ, मनीषा चौधरी, पृथ्वीराज चव्हाण, आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.

००००

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानातील सोयीसुविधांबाबत विकास आराखडा तयार करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 21 : मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच उद्यानामध्ये पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत दिवे, सुरक्षा याबाबत विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य आशिष शेलार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई महानगरपालिका हद्दीतील हायवेला चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे बांधण्यात येतील. महानगर पालिका क्षेत्रातील उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच मुले येत असतात. त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. पोशा नाखवा मैदानातील दिव्यांच्या दुरुस्तीचे आदेश तत्काळ देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार सदस्य छगन भुजबळ, नाना पटोले, योगेश सागर, अजय चौधरी यांनी सहभाग घेतला.

००००

समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी इंटरचेंजच्या ठिकाणी पर्यायी रस्त्याबाबत कार्यवाही करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 21 : समृद्धी महामार्गावर २५-३० किमी अंतरावर पर्यायी रस्त्यांसाठी इंटरचेंज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रस्ते वाहतूक सुलभ होण्यासाठी शहरांना जोडणाऱ्या इंटरचेंजच्या ठिकाणी पर्यायी रस्त्यांबाबत कार्यवाही करण्यात येईल असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड फाटा येथील इंटरचेंजमुळे पलीकडच्या गावांना २२-२४ किमी अंतर पार करून जावे लागते. यासाठी पळसखेड ते असोला फाटा हे ९ किमी अंतर आणि जउळखेड मार्गे ते असोला फाटा हे १२ किमी अंतर असे दोन पर्याय आहेत. हे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी याबाबत चर्चा करून दोन्ही पर्यायांपैकी कुठला पर्याय वापरता येईल, याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच समृद्धी महामार्गावरील स्मार्ट सिटीच्या संदर्भातील प्रस्तावांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. प्रस्तावित स्मार्ट सिटींसाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

०००

बंधारे बांधून तीनशे हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार – मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 21 : रायगड जिल्ह्यातील पहुर येथे बंधारा उभारणीबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत. या बंधाऱ्यामुळे त्या परिसरातील ३०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य अमीन पटेल यांनी पहूर कालव्यासाठी भूसंपादन न केल्यामुळे कालव्याअभावी सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला.

मंत्री श्री. सावंत म्हणाले की, पहूर कालव्याच्या भूसंपादनात स्थानिक शेतकऱ्यांनी सतत विरोध केला असल्यामुळे भूसंपादन करणे आतापर्यंत शक्य झाले नाही. सद्यस्थितीत दिल्ली – मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (DMIC)साठी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमीन संपादित झाली असल्याने सिंचन करणे शक्य नाही. भविष्यात डीएमआयसी कडून पाण्याची मागणी प्राप्त झाल्यास सदर पाणीसाठा हा औद्योगिक वापरासाठी डीएमआयसीला देणे किंवा हा प्रकल्प मालकी हक्काने डीएमआयसीला हस्तांतरित करून प्रकल्प खर्चापेक्षा जास्त महसूल गोळा करणे शक्य आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य अशोक चव्हाण, हरिभाऊ बागडे यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ/