गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २१ : मराठी नववर्षाचा प्रारंभ असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानाबद्दल चिंता व्यक्त करतानाच या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, गुढीपाडवा फक्त नव्या वर्षाचे स्वागत नाही तर नव्या संकल्पांचा सण आहे. नव्या विचारांची, नव्या कृतीची आणि नव्या स्फूर्तीची ऊर्जा देणारा सण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. गुढी उभारून या नव्या वर्षाचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. चैत्र महिन्यापासून निसर्गात होणाऱ्या चैतन्यदायी परिवर्तनाच्या स्वागताचाही उद्देश या उत्सवामागे आहे. आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या कल्याणाची भावना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. शेतकरी हिताचे निर्णय शासन घेत असून या कठीण काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे.

000000