संसर्गजन्य साथ आजाराच्या उपचारांसाठी नवीन रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 24 : मुंबई शहरात संसर्गजन्य साथीच्या आजारावरील उपचारासाठी सध्या कस्तुरबा रुग्णालय उपलब्ध आहे. वाढत्या रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी नवीन रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधान परिषदेत सदस्य विलास पोतनीस यांनी अर्धातास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, ज्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा अभाव आहे, तिथे आरोग्य सुविधा देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कस्तुरबा रुग्णालयासारखेच आणखी एका रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन कार्यवाही सुरू आहे. जिथे जागा उपलब्ध असेल त्यापैकी योग्य जागेचा पर्याय शोधला जाईल.
या चर्चेत सदस्य सुनील शिंदे, सचिन अहिर, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.
000
दीपक चव्हाण/विसंअ/
चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीतील १२३ कुटुंबाचे शिवशाही योजनेअंतर्गत पुनर्वसन करणार – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 24 : चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीमधील १२३ कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार असून शिवशाही योजनेतंर्गत रिक्त असलेली घरे या कुटुंबांना उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
टाटानगर इमारत वसाहतीची तत्काळ देखभाल, दुरुस्ती बाबत कार्यवाही व उपाययोजना बाबत म. वि. प.नियम ९२ अन्वये विधान परिषद सदस्य सचिन अहीर यांनी सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित केली होती.
उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले की, चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीमधील १२३ कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्यानुसार शिवशाही योजनेमध्ये उपलब्ध असलेली घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीच्या विकासासाठी महानगरपालिकेचा अथवा इतर कोणाचाही प्रस्ताव आलेला नाही. मुंबई महापालिकेतंर्गत उपकर प्राप्त इमारतींच्या प्रश्नाबाबत मुंबईतील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत म्हणाले.
या चर्चेत विधानपरिषद सर्वश्री सदस्य सुनील शिंदे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.
******
संरक्षण विभागाशी संबंधित विविध प्रश्नांसंदर्भात लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. २४ : संरक्षण खात्याशी संबंधित राज्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत राज्यातील कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री यांची भेट घेऊन या प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधानपरिषदेत सदस्य उमा खपरे यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री.सामंत म्हणाले की, संरक्षण विभागाने अनेक ठिकाणी संरक्षित ना – विकास क्षेत्र (रेड झोन) जाहीर केले आहेत. त्यामुळे त्या भागातील विकास योजना राबविताना अडचणी जाणवतात. देहू रोड ( जि. पुणे) येथील दारूगोळा कारखान्याच्या या रेड झोन मुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे या विषयावरही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्याबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे लवकरच बैठक घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.
या चर्चेत सदस्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.
0000
वर्षा आंधळे/विसंअ
मुंबईतील पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करणार – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. २४ : मुंबई शहराला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी पाणी गळती रोखण्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. आतापर्यंत ३ वर्षात ९ हजार २८४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, तर ९६ हजार ४७० ठिकाणची पाणी गळती दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य राजहंस सिंह यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुंबई शहराला सध्या तानसा, मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा धरणातून पाणीपुरवठा होतो. याशिवाय, गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा या तीन प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या काळात शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या तीनही प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या चर्चेत विलास पोतनीस, महादेव जानकर, अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.
0000
सूरजागड येथील लोह उत्खनन प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्यास प्राधान्य – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. २४ : सूरजागड, जि. गडचिरोली येथे सुरू असलेल्या लोह उत्खनन प्रकल्पात स्थानिक लोकांना प्राधान्याने रोजगार दिला जात आहे, असे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. विधानपरिषदेत म. वि. प.नियम ९२ अन्वये झालेल्या चर्चेवर उत्तर देताना ते बोलत होते.
सूरजागड येथे गेले काही वर्षापासून लोह उत्खनन प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामध्ये अवैध उत्खनन सुरू आहे. तसेच स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही. ज्या कंपनीद्वारे येथे उत्खनन होत आहे, तिथे संगणक प्रणालीद्वारे डॅशबोर्ड तयार करणे, जीपीएस आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने उत्खननाचे कार्य वैधरित्या केले जावे, अशी चर्चा म. वि. प.नियम ९२ अन्वये सदस्य अभिजित वंजारी यांनी सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर उपस्थित केली होती.
मंत्री श्री.भुसे म्हणाले की, सुरजागड – एटापल्ली येथे 1993 पासून लोहखनिज उत्खनन केले जाते. मेसर्स लाईट मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीला २००७ मध्ये काम देण्यात आलेले आहे. लोहखनिज उत्खनन ज्या कंपनीद्वारे सुरू आहे, त्यांच्या पाच वर्षे कामांची रूपरेषा ठरलेली आहे. 2008 -2009 ते 2020-21 मध्ये 4 लाख 49 हजार 463 टन इतके लोह उत्खनन करण्यात आले आहे, तर 2021,22 आणि 23 या वर्षात 57 लाख 59 हजार 528 टन इतके लोह खनिज उत्खनन करण्यात आले आहे. या खाणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली जात आहे. 3209 लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे.
घुगुसाच्या खाणीत 900 टन दर दिवसाला उत्खनन होते. तिथे 1 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतो. या प्रकल्पाची क्षमता वाढवून 1300 टन रोज उत्खनन होईल. या ठिकाणी दोन हजार रोजगार वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. घोणसरी प्रकल्प एप्रिल-मे महिन्यामध्ये कार्यान्वित होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1500 लोकांना रोजगार उपलब्ध होईल. या ठिकाणी सुरू असलेल्या खाणीमध्ये 50 टक्के स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने कार्यवाही केली आहे. शासनाला या खाणी मधून स्वामीत्वधन पोटी (रॉयल्टी पोटी) 390.10 लाख रुपये मिळाले आहेत. डी. एम. एम. फंडा साठी 107.50 कोटी निधी प्राप्त झाला आहे. एन मेट या फंडासाठी 6.42 कोटी मिळाले आहेत. सी एस आर मधून 6.25 कोटींची कामे करण्यात आलेली आहेत. या खाण प्रकल्पामध्ये कोणत्या प्रकारच्या त्रुटी असतील, तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुसे म्हणाले.
०००