डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन

जागतिक मान्यता असलेल्या गुणवत्तेवर केलेली शेती आणि संबंधित सर्व व्यवसाय मोठ्या प्रमाणात परकीय चलन भारतात खेचून आणतात. यादृष्टीने सेंद्रिय शेतीला महत्व प्राप्त झाले आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बिघडलेला जमिनीचा पोत, मानव आणि पशुपक्षांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम, कॅन्सरसारख्या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता नैसर्गिक शेती अतिशय महत्वाची ठरते.

अन्नधान्यांचे, फळे, भाजीपाल्याचे संकरित वाण पिकांच्या अधिक उत्पादनासाठी उपयुक्त असले तरी या पिकांना एकाच वेळेस एकसारखे उत्पन्न येण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यासोबतच  शेतीचा खर्च वाढतो आहे. त्यामुळे शेती किफायतशीर ठरत नाही.

शेतीवरील खर्च कमी करून गुणवत्तापूर्ण शेती उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने ऑक्टोबर २०१८ मध्ये डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना केली. हे मिशन महाराष्ट्र राज्यासाठी असून पहिल्या टप्प्यात मिशनचे कार्यक्षेत्र हे विदर्भातील नैराश्यग्रस्य जिल्हे अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा आहेत. मार्च २०२३ पर्यंत केंद्र शासनाच्या परंपरागत कृषी विकास योजनेचे अभिसरण करून मिशनद्वारा ४२० शेतकरी गटांची निर्मिती करण्यात आली आहे.

प्रत्येक गटात २० ते २५ शेतकरी उत्पादक आहे व या प्रत्येक गटांची कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत नोंदणी असून राष्ट्रीयकृत बँकेत अध्यक्ष व प्रवर्तक/सचिव यांचे गटाचे संयुक्त खाते उघडण्यात आले आहे. गटामध्ये सहभागी होण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ४ हजार रुपये भागभांडवल गटाच्या खात्यात जमा केले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन मधील ४२० गटामध्ये एकूण ८ हजार ९९१ उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला असून ३७ हजार ७०२ एकर क्षेत्र हे सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी नोंदविले आहे. मिशन अंतर्गत स्थापन झालेल्या गटांना शेतकऱ्यांची क्षमता बांधणी होण्याकरिता मिशनच्या माध्यमातून दर वर्षी तीन प्रशिक्षण दिले जातात.

शेतावरच सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासाठी प्रती गटाला जास्तीतजास्त ५० एकर किंवा २० हेक्टर पर्यंत किंवा प्रती शेतकरी जास्तीतजास्त २.४७ एकर पर्यंत अनुदान देण्यात येते. त्या मध्ये माती परीक्षण, आवश्यकतेनुसार पाणी परीक्षण, जैविक कुंपण, चर अथवा शेताच्या कडेने बंधारा करणे, सेंद्रिय बियाणे संकलन अथवा सेंद्रिय पद्धतीने रोप निर्मिती करणे, हिरवळीच्या खतांची लागवड करणे, गांडूळ खत, नाडेप कंपोस्ट खत तयार करणे, बीज प्रक्रिया, जीवामृत, बीजामृत तयार करणे, पीक संरक्षणासाठी उपाययोजना करणे, जैविक कीडनाशक व बुरशीनाशकांचा वापर करणे, स्थानिक आवश्यकतेनुसार सफाळे इत्यादी बाबीसाठी मिशन मधील गटातील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. मिशन मधील सर्व ७ हजार ८५१ शेतकरी हे सेंद्रिय निविष्ठा आपल्या शेतावरच तयार करता आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झालेला आहे.

दहा शेतकरी उत्पादक गटांना एकत्र करून एक समूह (क्लस्टर) तयार करण्यात आला आहे. प्रती समुहासाठी मिशनस्तरावरून तज्ज्ञ प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे. एकूण ४३ शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून नोंदणीकृत करण्यात आल्या आहेत. एका समूहासाठी १५ ते २० किमी अंतर असलेल्या परीघाच्या आत समूह संकलन केंद्र (सीएसी) स्थापन करण्यात आले आहे. हे समुहामधील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र व उत्पादित मालाचे खरेदी विक्री तसेच साठवणूक व प्रक्रिया केंद्र म्हणून कार्य करेल. सद्यस्थितीत १८ शेतकरी उत्पादक कंपनीचे समूह संकलन केंद्राच्या बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक मान्यतेसह मिशनची पूर्वसंमती व कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. या १८ पैकी १६ बांधकाम प्रगतीपथावर आहे.

मिशन अंतर्गत स्थापन झालेल्या ४३ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन २४ फेब्रुवारी २०२१ रोजी महासंघ ऑरगॅनिक मिशन शेतकरी उत्पादक कंपनी लि. नावाने कंपन्यांचा महासंघ नोंदणीकृत केला आहे.  सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पिकवलेला सेंद्रिय शेतमाल हा एकाच छताखाली आणि एकच बाजार नावाने विक्री करण्यासाठी तसेच बाजारात वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ब्रॅण्ड नेम व ट्रेडची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे.

सर्व शेतकरी उत्पादक कंपनी करिता सामुहिक सुविधा केंद्राची (सीएफसी) निर्मिती करणे, मिशन अंतर्गत उत्पादित जैविक शेतमालाच्या किरकोळ व ठोक विक्रीची मूल्यासाखळी व मूल्यवर्धन निर्माण करण्याचे कार्य महासंघ ऑरगॅनिक मिशनच्या माध्यमातून होत आहे.

जागतिक स्तरावर सेंद्रिय उत्पादनांना असणारी वाढती मागणी, त्यांना मिळणारे जादाचे दर व उत्पादित होणारे सेंद्रिय उत्पादन या बाबींचा विचार तृतीय पक्ष प्रामाणीकरणासाठी ‘अपेडा’ मान्यताप्राप्त ग्रीन सर्ट बायो सोल्युशन्स पुणे या संस्थेची निवड करण्यात आली. या माध्यमातून मिशनमधील शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण करण्यात येत आहे.

शेतातील पीक उत्पादनानंतर त्याचे प्रमाणीकरण करून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन करत आहे. शेतकऱ्यांची संघटनात्मक बांधणी करून शेतकरी उत्पादक कंपनी आणि महासंघाच्या माध्यमातून एक शाश्वत व्यवस्थेची निर्मिती उभी करण्यात आली आहे.

मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. जमिनीचा वाढणारा सेंद्रिय कर्ब, पर्यावरणाचा समतोल व जमिनीची वाढणारी सुपीकता या जमेच्या बाजू आहेत. ग्राहकांना विषमुक्त अन्न उपलब्ध होत आहे आणि शेतकऱ्याचे उत्पन्नही वाढते आहे. ‘सकस अन्न संपन्न शेतकरी’(हेल्दी फूड वेल्दी फार्मर) हे ब्रीद वाक्य डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन खरे करून दाखवत आहे .

 –आरिफ शहा,

कृषि उपसंचालक

(संकलन-जिल्हा माहिती कार्यालय,पुणे)