कृषी सिंचन योजनेमुळे एकरी उत्पादनात वाढ; खतावरील खर्चातही कपात

शेतीला जलसिंचन करणे हे शेतकऱ्यासमोरील मोठे काम असते. पारंपरिक पद्धतीने शेतीला पाणी दिल्यास इंधन, वेळ आणि पाण्याचा अपव्यय होतो. यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत शेतीमध्ये सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर व्हावा, यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजना राबविण्यात येते.

महाराष्ट्रात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सन 2015 -16 पासून राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनामध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना ‘प्रति थेंब,अधिक पीक’ हे ब्रीदवाक्य घेऊन राबविली जाते. या योजनेचा लाभ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने दिला जातो.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील चिंचरगव्हाण येथील गणेश साहेबराव गांगडे या शेतकऱ्यांनी घेतला. श्री. गांगडे यांनी 6 एकर शेतीसाठी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला .यासाठी त्यांना 29 हजार 308 रुपयांचे अनुदान मिळाले .पूर्वी त्यांना संत्री , मोसंबी आणि कपाशी पीकातून  अडीच लाखांपर्यंत उत्पादन व्हायचे. ठिबक सिंचनाचा लाभ घेतल्यापासून उत्पादन वाढून ते तीन लाखांपर्यंत गेले. हा फायदा झाल्यापासून ते इतर शेतकऱ्यांनाही यासाठी प्रोत्साहित करीत आहेत .

अमरावती जिल्ह्यातील चांदुररेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील श्रीराम प्रल्हादराव होले या शेतकऱ्याने अडीच एकर शेतीसाठी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला. यासाठी त्यांना 51 हजार 728 रुपयांचे अनुदान मिळाले .यातून त्यांनी संत्री आणि कपाशीच्या पिकासाठी ठिबक सिंचन सुरू केले. पूर्वी त्यांच्या पिकाचे मूल्य 58 हजार 400 रुपये होते. ठिबक सिंचनामुळे पिकाचे मूल्य 1 लाख 9 हजार 500 रुपये एवढे झाले. शिवाय ठिबक सिंचनाव्दारे कीटकनाशक औषधे झाडांना दिली. यामुळे खतांवर होणारा वेगळा खर्चही वाचला.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये सूक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पूरक बाबी अशा दोन उपघटकांचा समावेश आहे . यामध्ये केंद्र व राज्य राज्य शासनाच्या निधीचे प्रमाण 60 : 40 असे आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन घटकांतर्गत शेतकऱ्यांच्या वर्गवारीनुसार अनुदान देय आहे. यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला अनुज्ञेय खर्चाच्या 80 टक्के अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या 80 टक्के यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत 55 टक्के व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत 25 टक्के अनुदानाचे वाटप करण्यात येते.

याशिवाय अन्य शेतकऱ्यास अनुज्ञेय खर्चाच्या 75 टक्के अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या 75 टक्के यापैकी कमी असेल त्या रकमेचे अनुदान देण्यात येते. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 45 टक्के व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 30 टक्के एवढ्या अनुदानाचे वाटप करण्यात येते .

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्रात वाढ करण्यावर भर देण्यात येत आहे. याशिवाय जलवापर कार्यक्षमतेतही वाढ करण्यात येत आहे. या सिंचन योजनेमुळे कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादनात वाढ होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी व फलोत्पादनाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करण्यात आली आहे. यासाठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी उपलब्ध अल्प पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय अथवा कृषी सहायक यांचाशी संपर्क साधावा.

 

अपर्णा प्र .यावलकर, माहिती अधिकारी

जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती