कोल्हापूर, दि.1 (जिमाका): ग्रामीण संस्कृती टिकवण्यासाठी विविध उपक्रम राबवून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील. कांडगावच्या विकासाचा एकात्म आराखडा तयार करावा. विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना जन सुविधा पुरवण्याच्या योजनेअंतर्गत कांडगाव येथील मुख्य रस्ता, भूमिगत गटार, पाणंद वस्तीत रोहित्र व वाढीव पोल, अंगणवाडी नवीन इमारत आदी 67 लाख 51 हजार रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच तेजस्विनी अनिल चव्हाण, उपसरपंच हर्षद पाटील, बाळासाहेब यादव, ग्रामसेवक आर. आर. चौगले, उदय चव्हाण, दत्तात्रय मेडशिंगे आदी उपस्थित होते
ग्रामस्थांनी गावागावांतील अंतर्गत वाद टाळून एकत्र येऊन आपल्या गावांचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन करुन श्री. पाटील म्हणाले, तरुणांचा शहरांकडे वाढत जाणारा लोंढा गावामध्येच राहून खेड्याची आणि गावाची संस्कृती टिकवण्यासाठी गावांच्या विकासाला येत्या काळात विशेष प्राधान्य दिले जाईल. गावातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महिलांना आरोग्य सेवा, सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विकासकामांचा दर्जा चांगला राहील याकडे लक्ष द्यावे. कांडगावातील अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, पाझर तलाव, शाळांचे व मंदिराचे बांधकाम व दुरुस्ती, महिलांना आरोग्य सेवा सुविधा आदी विविध कामांचा समावेश असलेला एकात्म विकास आराखडा तयार करावा. यासाठी गावातील उच्च शिक्षित युवक युवतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
या विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.