मुंबई, दि. ७ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने उद्या शनिवार ८ एप्रिल रोजी ग्रॅंटरोड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
मेळावा सकाळी ९ वा. शारदा मंदिर हायस्कूल, गावदेवी, ग्रॅंटरोड (प.) येथे सुरु होणार आहे. मेळाव्यात विविध प्रकारच्या ५ हजार ५८३ पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून एकूण २५ कंपन्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थित राहतील. कौशल्य विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्रात या प्रकारचे एकूण ४० मेळावे झाले असून मुंबईत होणारा हा १७ वा मेळावा आहे. नोकरीइच्छुक उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
०००