गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धनादेशाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

सोलापूर, दि. ८, (जिमाका) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत मृत खातेदारांच्या सात वारसांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज येथे प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येकी दोन लाख रूपयांच्या मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

अंजली ज्ञानेश्वर साठे (दारफळ बी.बी, ता. उ. सोलापूर), श्रीदेवी लालचंद माळी व पुष्पा विश्वनाथ स्वामी (दर्गनहळ्ळी, ता. द. सोलापूर), आशाबाई वसंत माळी (आलेगाव, ता. द. सोलापूर), मदिना नरोकीन दाखने (शिरवळ, ता. अक्कलकोट), भाग्यश्री श्रीशैल कापसे (जेऊर, ता. अक्कलकोट), धुंडावा बसवराज मद्री (करजगी, ता. अक्कलकोट) अशी मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत सन २०२१-२२ मध्ये सोलापूर जिल्ह्यातून २६३ प्रस्ताव प्राप्त झाले होते व सर्व प्रस्ताव कंपनीकडे दाखल केले होते. त्यातील १६० प्रस्ताव मंजूर झाले. ५७ प्रस्तावांवर कार्यवाही सुरू असून, ४६ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. याअंतर्गत ३ कोटी १७ लाख रूपये विमा वाटप करण्यात आले. तसेच, ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या खंडित कालावधीमधील १०५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ८५ प्रस्ताव आयुक्तालयास सादर करण्यात आले. पैकी ६७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ३८ प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. याअंतर्गत १ कोटी ३४ लाख रूपये मदत वाटप करण्यात आली आहे. आज प्रातिनिधीक स्वरूपात धनादेश वितरण करण्यात आले असून, उर्वरित वारसांना देण्यात येणारी मदत आरटीजीएसद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

०००