गायकवाड कुटुंबाला रेशीमशेतीतून मिळाला रोजगार आणि कीटकसंगोपन गृहासाठी अनुदान !

0
12

रेशीम उद्योग हा शेतीवर आधारीत असा कुटीरोद्योग आहे. तुती हे वर्षभर पाला देणारे पीक आहे. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर ती 12 वर्ष राहते. पुन्हा-पुन्हा तुतीची लागवड करावी लागत नाही. सोलापूर जिल्ह्यात रेशीम शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पंढरपूर तालुक्यातील गंगुबाई शामराव गायकवाड यांच्या कुटुंबाला रेशीमशेतीतून रोजगार आणि कीटकसंगोपन गृहासाठी अनुदान मिळाले आहे. त्यांच्या कुटुंबावर कसलेही कर्ज नाही, हे विशेष!

श्रीमती गंगुबाई शामराव गायकवाड यांचे गाव पंढरपूर तालुक्यातील सरकोली. गंगूबाई यांच्यासह मुलगा, सून व दोन नातू असे पाच माणसांचे कुटुंब. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून त्यांनी त्यामध्ये ऊस लावलेला होता. पण उसाचे उत्पन्न दीड वर्षातून एकदा मिळत होते. तेही म्हणावे तेवढे नव्हते. एके दिवशी त्यांचा नातू पांडुरंग प्रकाश गायकवाड हा भंडीशेगावमधील त्याच्या मित्राकडे गेला असता, त्याला रेशीम अळ्यांच्या कीटकसंगोपनाची माहिती मिळाली. दरम्यान, त्याने अधिक माहिती घेतली असता, मनरेगा अंतर्गत भंडीशेगाव, भाळवणी गावातील काही शेतकऱ्यांनी तुती लागवड केल्याचे त्यांना समजले. आपल्याच शेतात काम करून शासनाच्या रोजगार हमी योजनेतून मजुरी व अनुदान पण मिळते, हे समजताच गंगुबाई यांच्या नातवाने रेशीम शेती करण्यासाठी आग्रह धरला.

एवढ्यावरच न थांबता पांडुरंग गायकवाड यांनी रेशीम अधिकाऱ्यांना भेटून तुतीच्या लागवडीची व मनरेगा अंतर्गत कामाची सविस्तर माहिती घेतली. ही तीन वर्षांची योजना आहे. तीन वर्षांमध्ये 895 दिवसांची मजुरी मिळते. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात, याची संपूर्ण माहिती घेतली.

याबाबत गंगुबाई गायकवाड यांच्यावतीने नातू पांडुरंग गायकवाड म्हणाले, सन 2019-20 मध्ये मनरेगा अंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही प्रति एक एकरमध्ये तुती बागेत रोपाद्वारे 6000 रोपे लावली. त्याची पाहणी करून कामाचा सांकेतांक (वर्क कोड) काढण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायतीमधील रोजगार सेवकाने माझ्याकडून ई-मस्टर कामाची मागणी अर्ज भरून घेतला. त्यामध्ये घरातील पाच लोकांची नावे व त्यांचा बँकेतील खाते क्रमांक मांडून दिला. आम्ही प्रत्येकाचे स्वतंत्र राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक काढले. त्यानंतर माझ्याच शेतात काम करत आम्हा पाच कुटुंब सदस्यांची मजुरी प्रति लाभार्थी प्रती दिन रुपये 256 प्रमाणे प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झाली. विशेष म्हणजे आमच्या नावावर कुठलेही पीककर्ज किंवा वैयक्तिक कर्ज नाही, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

त्यानंतर गंगुबाई गायकवाड यांनी कीटक संगोपनगृह बांधले. याबाबत त्या म्हणाल्या, कीटक संगोपनगृह, तुती रोपे नर्सरी, कीटक संगोपन साहित्य, जैविक खते, कुशल बिलाचे मला रक्कम रुपये 1,00010 मिळाले व अकुशल कामाचे रक्कम रुपये 1,80,708 असे एकूण रक्कम रुपये 2,80,718 मिळाले. सन 2022-23 मध्ये आम्ही 850 अंडीपुंज घेऊन 680 किलो कोष उत्पादन घेतले. त्यापासून मला रक्कम रुपये 3,63,500 मिळाले. त्यानंतर मी शेतीला जोडधंदा देण्यासाठी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी 1 गाई व 1 म्हैस खरेदी केली. या उद्योगातून माझ्या कुटुंबातील सर्वच लोकांना घरच्या घरी काम मिळालेले आहे. सिल्क व मिल्क या प्रकारे दोन व्यवसाय चालू आहेत.

एकूणच गायकवाड कुटुंबाला तुती लागवड, कीटक संगोपन व धागा निर्मितीमधून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.

संप्रदा बीडकर

जिल्हा माहिती अधिकारी,

सोलापूर

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here