ठाणे, दि. 21 (जिमाका) – ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य, महिला व बाल आणि संदर्भ सेवा सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा भूमीपूजन सोहळा उद्या, दि. २२ एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी सांगितले.
भविष्यातील वाढती लोकसंख्या गृहित धरून व आपत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेऊन या रुग्णालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. सुमारे 6 लाख 81 हजार 397.40 चौ.फूट इतके या इमारतीचे बांधकाम असणार आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, संदर्भ सेवा सुपरस्पेशालिटी रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय तसेच परिचारिका प्रशिक्षण केंद्राचा समावेश असणार आहे. एकूण 900 खाटांचे हे रुग्णालय असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीसाठी प्रयत्न केले होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी घेतला आढावा
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज नियोजित भूमीपूजन स्थळी जाऊन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी इमारतीच्या बांधकाम, उद्या होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी, उपस्थितांची व्यवस्था आदींचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार आदी उपस्थित होते.