कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री विमा योजना..!

0
9

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर “जनसुरक्षा मोहीम” राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर 30 जूनपर्यंत शिबिरांचे आयोजन केले आहे. कुटूंबाला सुरक्षित करण्यासाठी आपापल्या ग्रामपंचायतीच्या शिबिराला भेट देवून या योजनांमध्ये सहभाग नोंदवता येईल.

 आवश्यक बँक खाते- आतापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 72 हजार नागरिकांनी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा लाभ घेतला आहे, तर 8 लाख 16 हजार नागरिकांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेतला आहे. या दोन्ही योजनांसाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, सर्व खासगी बँका व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांपैकी कोणत्याही बँकेत आपले बचत ठेव खाते असल्यास या दोन्ही योजनांचा लाभ घेता येईल. 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना – एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी अपघाती मृत्यू आणि अपंगत्व यासाठी 2 लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी ही योजना आहे. यामध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होवू शकतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वार्षिक हप्ता 20 रुपये प्रती व्यक्ती प्रती वर्षी इतका अल्प आहे. विमा धारकाचा मृत्यू झाल्यास अथवा दोन्ही डोळ्यांची संपूर्ण अथवा बरी न होणारी हानी झाल्यास किंवा दोन्ही हात अथवा दोन्हीपाय निकामी झाल्यास  2 लाख रुपये इतकी भरपाई मिळते. तसेच या योजनेमध्ये एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किंवा एक हात व एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये इतकी भरपाई मिळते.

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना – नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण देणारी ही योजना आहे. यामध्ये 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होवू शकतात. या योजनेत सहभागी झालेल्या विमा धारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास वारसाला 2 लाख रुपये इतकी भरपाई मिळते. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजने अंतर्गत वार्षिक हप्ता 436 रुपये इतका प्रती व्यक्ती प्रती वर्षी आहे. केवळ 456 रुपये इतक्या अत्यल्प वार्षिक हप्त्यामध्ये यादोन्ही विमा सुरक्षा योजनांमध्ये नागरिक सहभागी होवू शकतात.

नोंदणीसाठीचा कालावधी व वेळ- भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल ते 30 जून 2023 म्हणजेच या तीन महिन्याच्या कालावधीत जिल्हा प्रशासन, अग्रणी जिल्हा बँक म्हणजेच आपल्या जिल्ह्यासाठी बँक ऑफ इंडिया, इतर सर्व खासगी बँका, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या समन्वयाने ही मोहीम राबवण्यात येत आहे. शिबिराचे वेळापत्रक संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये हे शिबिर सकाळी 10.30 ते दुपारी 4 या वेळेत सुरु राहील. 

आवश्यक कागदपत्रे- या दोन्ही योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी बँक पासबुक व केवायसी कागदपत्रे उदा. पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र इत्यादी कागदपत्रांसह शिबीराला भेट देवून या दोन्ही योजनांमध्ये आपली नोंदणी करावी. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा योजनेचा कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे असा असतो. दोन्ही योजनांमध्ये दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असून एकदा नोंदणी झाल्यानंतर दरवर्षी विम्याचा हप्ता ऑटोडेबिट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. काही अडचणींमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येते. शिबिरामध्ये कागदपत्रांसह पूर्ण अर्जावर व्यवसाय समन्वयक (BC) यांच्या मशीनद्वारे दोन्ही योजनांमध्ये त्वरित ऑनलाईन नोंदणीची देखील सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांबरोबरच बचत गटातील महिलांनी देखील या दोन्ही योजनांमध्ये आपली 100 टक्के नोंदणी करावी आणि कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील या दोन्ही योजनांमध्ये सहभागी होण्याबाबत प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठीचा 456 रुपये वार्षिक हप्ता भरुया..  या दोन्ही योजनांमध्ये सहभागी होवूया.. आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित करुया..

०००००

शब्दांकन-वृषाली पाटील,

माहिती अधिकारी,

कोल्हापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here