प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस- पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

0
9

नंदुरबार,दि.2 मे 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

नंदुरबार येथील नविन कृषि भवन इमारतीचे उद्धाटन  पालकमंत्री डॉ.गावित हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमांला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील,कोळदा कृषी विद्यान केद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.राजेंद्र दहातोंडे, प्रकल्प संचालक प्रदिप लाटे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गावित म्हणाले, आपल्या जिल्ह्यात नद्या, धरण व बॅरेजमध्ये पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध असून हे पाणी औद्योगिक प्रकल्प, पिण्यासाठी देवून सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत देवू शकतो इतका पाणीसाठा आपल्या जिल्ह्यात आहे. म्हणून आगामी काळात प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, बॅरेजांनी गती देण्यासाठी मागील काळात भरपूर प्रमाणात निधी दिला. त्यातून हे प्रकल्प पूर्णत्वास आले. नर्मदा प्रकल्पातील आपल्या वाट्याचे पाणी आपणांस मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे हित बघून हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र आले तरच ही गोष्ट लवकर होऊ शकेल असे मत त्यांनी यावेळी मांडले.

पुढे बोलतांना डॉ.गावित म्हणाले की, शाश्वत सिंचनाच्या उपाययोजना होईपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध जलस्रोतांच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेण्याची आवश्यकता असून त्यासाठी शेती, फलोत्पादनाच्या कृषी व आदिवासी विकास विभागाच्या शेडनेट, पॉलीहाऊस, ड्रीप योजना अर्थसहाय्याच्या विविध योजना असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मधल्या काळात बऱ्याच शेतकऱ्यांना शेडनेट दिले. शेडनेट योजनेतून अवघ्या 10 गुंठे जमीनीवर सरासरी 5 ते 10 लाखांचे उत्पन्न शेतकऱ्यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देवून कमी वेळेत, कमी खर्चात, कमी मेहनतीत उत्पन्न तिप्पट ते चारपट वाढले पाहिजे  यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

डाब येथील स्ट्रॉबेरी खरोखर सुंदर आहे. या भागातील स्ट्रॉबेरीचा दर्जा उत्तम असून त्याला चवही अंत्यत चांगली आहे. याचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. आपल्या तोरणमाळ व डाब येथील थंड भागात होणारी पिकांना चालना देण्याची गरज आहे यासाठी नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. तसेच ब्रोकोली सारख्या पिकास चांगला दर असल्याने या पीकाच्या  लागवडीसाठी चालना द्यावी. शेतकरी  स्वत:च्या पायावर भक्कम कसा ऊभा राहील तो आर्थिक दृष्टया सक्षम कसा राहील याची मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नंदुरबार येथील कृषी चिकीत्सालय व बळकटीकरणाच्या  उर्वरीत कामासाठी यावर्षी निधी उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.

00000

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here