राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

औरंगाबाद  दि 14 (जिमाका)- सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे,  राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह हे स्वाभिमानी राजे होते, त्यांनी प्राण पणाला लावून राष्ट्राप्रति असणारा स्वाभिमान जपला. जनतेचा राजा म्हणून ओळख असलेल्या महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास अजरामर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.

औरंगाबाद शहरात सकल राजपूत समाजाच्या वतीने आज ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.  अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते.  कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार जयकुमार रावल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह आणि शिवाजी महाराज हे साहसी होते. महाराणा प्रतापसिंह यांनी सवंगड्यांना देखील युद्धाचे धडे दिले. सर्वसामान्य जनतेला आपलंसं केलं. महाराणा प्रतापसिंह यांनी अकबराच्या सैन्याला जेरीस आणले. हे दोन्ही धर्मवीर राजे आपल्या भूमीत होऊन गेले. यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत, असे सांगून राजपूत समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढून टाकण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याची घोषणा करून आता यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात येणार असून महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

लढवय्ये महाराणा प्रतापसिंह स्वाभिमानाचे प्रतिक- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

राष्ट्रीय स्वाभिमानाची भावना महाराणा प्रतापसिंह यांच्यात होती. त्यांनी आपले जीवन जंगलात व्यतित केले.  असे हे लढवय्ये महाराणा प्रताप सिंह स्वाभिमानाचे प्रतिक आहेत. पाचशे वर्षांपूर्वी महाराणा प्रताप जेवढे महत्त्वाचे होते आजही तेवढेच महत्त्वाचे आहेत, आणखी हजारो वर्षांनंतरही ते  महत्वाचे असतीलच. महाराणा प्रताप यांच्या कार्यकाळाला मुघल काळ न म्हणता महाराणा प्रताप काळ म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षाही केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. 

राजपूत समाजाला योजनेपासून वंचित ठेवणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजपूत समाजाचे या देशाच्या इतिहासात  मोठे योगदान आहे. प्राण गेले तरी चालेल पण देशसेवा महत्वाची मानणारा हा समाज आहे. अशा या  समाजाला आता कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी येत्या  15 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.