मुंबई दि. 30 : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘शासन आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या गुरूवार आणि शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
केव्हा आणि कुठे होईल संवाद
गुरूवार दि 1 जून रोजी महानगरपालिकेच्या ‘ए आणि बी वॉर्ड’ मध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटी हॉल, 141, शहीद भगतसिंह मार्ग, फोर्ट, मुंबई येथे तसेच शुक्रवार दि. 2 जून रोजी ‘जी उत्तर वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, जी उत्तर विभाग कार्यालय, मुंबई येथे दुपारी 3 ते 5 या वेळेत तर ‘जी दक्षिण वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, जी दक्षिण विभाग कार्यालय, मुंबई येथे सायंकाळी 5 ते 7 वेळेत पालकमंत्री श्री.केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे ‘जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमास पालकमंत्री यांच्यासोबत संबंधित भागातील लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय अधिकारी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
00000
बी.सी.झंवर/विसंअ/