शहरातील नाट्यगृहांच्या नूतनीकरणासाठी नागरिकांकडून सूचना मागवा

0
10

पुणे, दि.१: शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी जून अखेरपर्यंत नागरिक तसेच नाट्यकलावंतांकडून सूचना मागवाव्यात आणि १५ जुलैपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू करून ऑगस्ट अखेरपूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पुणे शहरातील सर्व नाट्यगृहांच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त चेतना केरुरे आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, बालगंधर्व रंगमंदिराच्या मूळ वास्तूचे नूतनीकरण करण्यात यावे. रंगमंदिराच्या स्वच्छतेसाठी अनुभवी संस्थेची नेमणूक करून नीटपणे स्वच्छता राखली जाईल याची दक्षता घ्यावी.  रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी नागरिकांकडून सूचना मागवाव्यात आणि जून अखेरपर्यंत सर्व कामांच्या निविदा काढण्यास सुरुवात करावी. दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात यावी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या लक्षात घेता नाट्यगृह दुरुस्ती कामासाठी बंद करण्याबाबत एक महिनापूर्वी पूर्वसूचना देण्यात यावी.

श्री गणेश कला क्रीडा मंच येथे वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात यावी. प्रत्येक नाट्यगृहातील कामांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नूतनीकरणाची कामे करताना नाट्यकलावंतांकडूनही त्यांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात. पं. भीमसेन जोशी कलामंदिराच्या रॅम्पचे काम त्वरीत करावे. अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे दुरुस्तीचे कामही करण्यात यावे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतन इमारतीचे उर्वरित काम पुढील तीन महिन्यात पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पाषाण भागातील समस्यांचा आढावा

पाषाण-सूस रोडवरील अतिक्रमणाचे काम जून अखेरपर्यंत करावे. स्मार्ट सिटीअंतर्गत जनतेच्या दृष्टीने आवश्यक कामांना भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. पाषाण परिसरातील रस्त्यांची कामे तेथील जागेचे प्रश्न सोडवून तात्काळ सुरू करावीत. नागरिकांच्या समस्या सोडविताना त्यांच्याशी संवाद साधावा आणि कामात येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात. १० जूनपर्यंत बाणेर-बालेवाडी आणि पाषाण भागातील पाण्याची समस्या दूर होईल याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here