मुंबई, दि. १ : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, शेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षण आणि पशु शक्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे, असे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
महिलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जीआयझेड (GIZ) व नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विज्ञापीठ यांच्यात सामंजस्य करार सह्याद्री अतिथिगृह येथे करण्यात आला, त्यावेळी मंत्री श्री. लोढा बोलत होते. महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, महाव्यवस्थापक (प्रकल्प) कुसुम बाळसराफ, (माविम), नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक शिक्षण विस्तार डॉ.अनिल भिकणे, जीआयझेडचे जर्मनीचे वाणिज्यदूत अचिम फबीग, जीआयझेडचे संचालक राजीव अहाळ, रणजित जाधव, जितेंद्र यादव, ओमकार शौचे यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, जीआयझेड (GIZ) या संस्थेबरोबर करार केल्यामुळे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन शाश्वत शेतीसाठी उपक्रम राबविण्यास मदत होणार आहे.माविमने शाश्वत शेती व बचतगट क्षेत्रात राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती जीआयझेड या संस्थेला देण्यात येईल. दोन्ही संस्था व राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून परस्पर संवादातून महिला बचत गटांना आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य, जिल्हा, तालुका व गावस्तरावर योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. नागपूर येथील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रशिक्षणाच्या संधी महिलांना मिळतील. या विद्यापीठांतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये महिलांना शेळीपालन, पोल्ट्री प्रशिक्षण आणि पशुशक्ती प्रशिक्षण देण्यात येतील.या प्रशिक्षणाचा महिलांना नक्कीच आर्थिक स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत होईल, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.
000
संध्या गरवारे/विसंअ/