युवकांनी कष्टाची तयारी ठेवावी – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

        सांगली दि. 1 (जि.मा.का.) : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल येथे आयोजित पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 1 हजार 607 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातून 527 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 171 उमेदवारांची अंतिम अशा एकूण 698 उमेदवारांची निवड केली आहे. रोजगार मेळाव्यातून नियुक्त झालेल्या उमेदवारांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्ती पत्रे वितरीत करण्यात आली.

            या रोजगार मेळाव्याचा समारोप समारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे,मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलचे सचिव प्रा. मोहन वनखंडे, तहसिलदार अपर्णा मोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम, सुशांत खाडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, विविध  कंपन्यांचे प्रतिनिधी आणि, रोजगार प्राप्त उमेदवार उपस्थित होते.

युवकांनी कष्टाची तयारी ठेवावी

            रोजगार मेळाव्यातून विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना  पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शुभेच्छा देवून जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा असा संदेश दिला. आपल्या निवडीच्या ठिकाणी रूजू होवून प्रामाणिक सेवा बजावा. आपले व आपल्या कुटुंबाचे नाव लौकिक करा. या मेळाव्यात कंपन्यांनी आपल्या दारात येवून नोकऱ्या दिल्या आहेत. शासन आपल्या दारी ही संकल्पना खऱ्या अर्थाने साकारत आहे, असेही त्यांनी सांगितले.

            रोजगार मेळाव्यात 69 कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने टाटा ऑटोकॅम्प सिस्टम लि., एस. के. एफ. इंडिया प्रा. लि., टाटा मोटर्स, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा प्रा. लि., सिपला प्रा. लि., भारत फोर्ज लि., किर्लोस्कर ऑईल इंजिन लि., घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि. मेमन, महाबळ मेटल प्रा. लि., घोडावत कन्झ्युमर लि., घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि.,किर्लोस्कर ब्रदर्स लि. अशा विविध कंपन्यांचा समावेश होता. रोजगार मेळाव्यात कंपन्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगून  पालकमंत्री डॉ. खाडे यांनी  सर्व सहभागी कंपन्यांना धन्यवाद दिले.  कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

            नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या नोंदविण्यासाठी www.sureshkhade.com  हे वेब पोर्टल तयार करण्यात आले असून या वेब पोर्टलचे अनावरण पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी त्यांच्या समस्या या वेब पोर्टलवर नोंदवाव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले.

000000