उत्पादित वस्तू विक्रीसाठी महिलांना मिळणार हक्काचे व्यासपीठ – विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे

अकोला, दि. १० (जिमाका): महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व आर. आर. पाटील सुंदर ग्राम पुरस्कार निधी यांच्या माध्यमातून अकोला तालुक्यातील कापशी रोड येथे जिल्ह्यातील पहिले महिला बचत भवन उभारले जाणार आहे. याचे भूमिपूजन विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांच्या आज हस्ते झाले. यामुळे महिलांच्या उत्पादित वस्तू विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार असल्याचे डॉ. पांडे म्हणाल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी, कार्यकारी अभियंता अनिल चव्हाण, जल जीवन मिशन प्रकल्पाचे संचालक मदन सिंह बहुरे आदींची उपस्थिती होती.

विभागीय आयुक्त डॉ. पांडे यांनी महिला बचत गटांच्या महिलांची संवाद साधत त्यांच्या उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली. त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील एकमेव गोबरधन प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे गॅस व वीज निर्मिती होणार असून आजूबाजूच्या परिसरातील गोधन व शेती उत्पादनातील टाकाऊ घटकांचा वापर या प्रकल्पासाठी होणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प ठरणार असल्याची माहिती यावेळी दिली.

कापशी रोड येथील शाळेच्या भिंतीवर बाल सुलभ चित्रांची रंगरंगोटीची पाहणी विभागीय आयुक्तांनी केली. या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजना बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व जिल्हा परिषद यंत्रणेचे कौतुक केले. त्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत जल शुद्धीकरण प्रकल्पालाही भेट दिलह. यावेळी ग्रामपंचायतचे प्रशासक सतीश सरोदे, माजी सरपंच अंबादास उमाळे, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी व  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील राहुल गोडले, सागर टाकले आदी उपस्थित होते.

०००