पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारत सरकारच्या बहुमाध्यम वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे दि. ११- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केंद्र सरकाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे येथील केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने केंद्र सरकाचे ९ वर्षातील कार्य व प्रमुख योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या  फिरत्या बहुमाध्यम वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखिल देशमुख, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, योजनांचा प्रत्यक्ष लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.  माहिती अभावी नागरिक चांगल्या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ९ वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारने अनेक चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. मातृवंदना योजना,  आयुष्यमान भारत योजना यासह शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णयदेखील घेण्यात आले. याची माहिती नागरिकांना देण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोने चित्ररथ तयार केला असून हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. वारीत येणाऱ्या लाखो भाविकांना चित्ररथाच्या माध्यातून देण्यात येणाऱ्या माहितीचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात श्री. देशमुख यांनी चित्ररथाद्वारे केंद्र सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगितले.

आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण देशाभरातून येणारे वारकरी व भक्तांसाठी केंद्र सरकारच्या विविध विकासात्मक उपक्रमांची माहिती बहुमाध्यम प्रदर्शच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कलापथकांद्वारे मनोरंजन व अभंगाच्या माध्यमातून उद्बोधन व प्रबोधन करण्यात येणार आहे.  बहुमाध्यम वाहन प्रदर्शनात एलइडी स्क्रीन लावण्यात आली असून या स्क्रीनद्वारे केद्र सरकारचा ९ वर्षातील कार्यकाळात विकासात्मक व जनतेच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या प्रमुख  योजनांची माहिती देण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या  ठिकाणी भक्तीपर चित्रपटदेखील दाखविण्यात येणार आहेत.

०००