पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात उत्कृष्ट दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळण्यासाठी आराखडा बनवावा – क्रीडा मंत्री गिरीष महाजन

मुबंई, दि. २२ : राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी बालेवाडी, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये क्रीडा सुविधांचा अद्ययावत आराखडा मान्यतेसाठी लवकर मंत्रिमंडळासमोर सादर करावा, अशा सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.

राज्य क्रीडा विकास समितीची बैठक मंत्रालयातील परिषद सभागृह येथे झाली. त्यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन बोलत होते. बैठकीस वित्त (व्यय) अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, सचिव (बांधकामे) अरविंद तेलंग यासह क्रीडा विभागाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे खेळाडूंना उत्कृष्ट दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या क्रीडा संकुलाचा अद्ययावत आराखडा बनवावा. क्रीडा सुविधांसाठी आलेल्या सूचनांचा विचार करून हे क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. येथे सध्या खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्येही वाढ करून त्याप्रकारे खेळाडूंना सुविधा देण्यात याव्यात. राज्यात नव्याने होत असलेली व सध्या कार्यरत असलेल्या क्रीडा संकुलांचा पूर्णवेळ वापर होण्यासाठी नियोजन करावे. विभाग, जिल्हा, तालुका येथील मंजूर संकुलांची कामे गतीने होण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करावे. यावेळी नवीन तालुका क्रीडा संकुलांचे अंदाजपत्रक, सुधारित अंदाजपत्रक  तसेच अनुदान मर्यादेबाहेरचे अतिरिक्त अंदाजपत्रक व आराखडे तपासून घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. खेळाडूंना उत्कृष्ट दर्जाच्या सुविधांसाठी क्रीडा विभागाने आग्रही असले पाहिजे. ग्रामीण भागातही क्रीडांगणांसाठी नियोजन करावे, फुटबॉल या खेळाची लोकप्रियता पाहता फुटबॉल लीगची तयारी करण्यात यावी, या खेळासाठीही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असेही मंत्री श्री.महाजन म्हणाले.

****

संध्या गरवारे/विसंअ/