नव्या रूपाचं “आधार” आलंय जरा बघुया;आहे अस्सल टिकावू म्हणून तेच बनवुया !

0
9

सध्या बहुसंख्य जणांकडे जे आहे, ते नॉर्मल आधार कार्ड. ज्याची प्रिंट आऊट नॉर्मल कागदावर घेतलेली आहे. ते खराब होऊ नये म्हणून आपण त्याला लॅमिनेटही करतो. पण, काही दिवसांनी ते खराब व्हायला लागतं. कारण आधार कार्डचा वापरच मोठ्या प्रमाणात होतो. बहुसंख्य कामासाठी ते वापरलं जातं. पण, आता मी तुम्हाला जर सांगितलं की, जसं आपलं एटीएम किंवा पॅन कार्ड प्लास्टिक स्वरूपात मिळतं, तसंच आधार कार्डही मिळणार आहे, तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’नं आधार कार्ड एका नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ‘आधार पीव्हीसी कार्ड’ असं या नव्या स्वरूपाचं नाव आहे. त्यामुळे आता आधार कार्डवरील माहिती पीव्हीसी म्हणजेच polyvinyl chloride कार्डवर प्रिंट करून मिळणार आहे.

आधार पीव्हीसी कार्डाविषयी माहिती देताना UIDAI नं म्हटलंय की, “या कार्डाची प्रिटिंग क्वालिटी चांगली असते आणि ते अधिक काळ टिकतं. शिवाय पावसामुळेही ते खराब होत नाही. यावर क्यूआर कोड असल्यामुळे ऑफलाईन व्हेरिफिकेशनही होऊ शकणार आहे.” त्यामुळे मग आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाईन कसं काढायचं, त्यासाठी किती शुल्क आकारले जाणार आहे, याचीच माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.

आधार PVC कार्ड कसं काढायचं?

यासाठी सगळ्यात आधील तुम्हाला http://uidai.gov.in असं सर्च करायचं आहे, त्यानंतर भारत सरकारच्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ची वेबसाईट ओपन होईल. उजवीकडे वेगवेगळ्या भाषांचे पर्याय दिलेले असतील, त्यापैकी मराठीवर क्लिक करायचं आहे. पीव्हीसी आधार कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?

या वेबसाईटवर डावीकडे माझा आधार नावाचा रकाना दिसेल, यातील Order aadhar pvc card या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एका नवीन पेजवर तुम्ही जाल. इथेही भाषा बदलून मराठी करायची आहे. इथं तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. यातील दुसऱ्या आधार पीव्हीसी कार्ड मागवा यावर क्लिक करायचं आहे.

पुढच्या पेजवर तुम्हाला पीव्हीसी आधार कार्ड कसं असेल ते तिथं दाखवलेलं आहे. जसं की यावर क्यूआर कोड, होलोग्राम असणार आहे. या पेजवर तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत. आता तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल, तर तुम्ही डायरेक्ट ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करू शकता. पण ते नसेल तर इथल्या माझा मोबाइल नंबर नोंदणीकृत नाही या पर्यायासमोरील बरोबरच्या खुणेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवा म्हणायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी प्रविष्ट करा या रकान्यात तो टाकायचा आहे. पुढे असलेल्या नियम व अटीवर क्लिक केलं की तुम्हाला स्क्रीनवर एक मेसेज दिसेल. “मी माझ्या आधार पीव्हीसी कार्डच्या छपाईसाठी संमती देतो. ते माझ्या पत्त्यावर पोस्टानं येईल आणि त्यासाठी मी ५०/- रुपये देण्यास सहमत आहे.” अशा आशयाचा हा मेसेज आहे. मग प्रस्तुत करणे यावर क्लिक केलं की तुमचा अर्ज सबमिट होईल.

पुढे तुम्हाला स्क्रीनवर एक मेसेज दिसेल. आपली विनंती नोंदवली गेली आहे असं त्यात नमूद केलेलं असेल आणि एसआरएन नंबर दिलेला असेल. या मेसेजखालील बरोबरच्या खुणेवर टीक करून आणि मग देय द्या या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इथं वेगवेगळे पर्याय वापरून तुम्ही ५०/- रुपये भरू शकता. जसं मी कार्ड्स या पर्यायावर क्लिक करून माझ्या एटीएम कार्डावरचे डिटेल्स टाकले आहेत. मग प्रोसिड वर क्लिक केलं. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. तो इथं टाकायचा आहे. मग कम्प्लिट पेमेंटवर क्लिक करायचं आहे.

मग एक नवीन पेज ओपन होईल. जिथं तुमचा व्यवहार यशस्वी झाल्याचं दिसेल. खाली एसआरएन नंबर दिलेला असेल, हा नंबर वापरून तुम्ही तुमच्या पीव्हीसी कार्डचं स्टेटस पाहू शकणार आहात. पुढे कॅप्चा टाकला की मग पावती डाऊनलोड करा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही पावती डाऊनलोड होऊन मिळेल. या पावतीवर स्पष्टपणे नमूद केलंय की, तुमचं पीव्हीसी कार्ड ५ दिवसांत प्रिंट केलं जाईल आणि त्यानंतर ते स्पीड पोस्टनं आधार कार्डवरील पत्त्यावर पाठवलं जाईल.

पीव्हीसी कार्डचं स्टेटस कसं पाहायचं?

आता आपण ऑर्डर केलेल्या पीव्हीसी कार्डचं स्टेटसही ऑनलाईन पाहू शकतो. ते कसं तर त्यासाठी तुम्हाला माझा आधार या रकान्यातील check aadhar pvc card status या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवं पेज दिसेल. यातल्या आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर स्थिती तपासा यावर क्लिक करायचं आहे.इथं तुम्हाला पावतीवरील एसआरएन नंबर आणि कॅप्चा टाकून प्रस्तुत करणे वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सध्याची स्थिती या पर्यायसमोर तुम्हाला तुमच्या कार्डाची स्थिती दिसते. जसं की ते प्रिटिंगसाठी गेलं असेल तर तिथं प्रिटिंग प्रक्रिया असं लिहिलेलं असतं किंवा ते डिस्पॅच झालं, म्हणजे पोस्टातून निघालं की त्याची तारीखही इथं नमूद केलेली असते.

०००

  • रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here