अमरावती, दि. 23 : मोझरी, वलगाव व कौंडण्यपूर विकास आराखड्यांची कामे गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. अपूर्ण कामांचा प्रत्यक्ष सद्यस्थिती अहवाल यंत्रणांनी सादर करावा. त्यानुषंगाने निधीची तरतूद करणे सोईचे होईल. आराखड्यांतर्गत करावयाच्या कामांच्या संदर्भात पुरवणी मागण्यांचे प्रस्ताव तत्काळ सादर करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मोझरी, वलगाव तसेच कौंडण्यपूर विकास आराखड्यांतर्गत येणाऱ्या कामांचा आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकांव्दारे आज घेतला. आमदार यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, उपायुक्त अजय लहाने, उपविभागीय अधिकारी विशेष कार्याधिकारी हर्षद चौधरी यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तीर्थक्षेत्र मोझरी, श्री क्षेत्र कौंडण्यपूर व संत गाडगेबाबा यांची निर्वाणभूमी वलगाव या ठिकाणांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.
मोझरी विकास आराखड्यांतर्गत सन 2009 मध्ये 78 कोटी 64 लाख रुपये पंधरा कामांसाठी, वर्ष 2011 मध्ये 125 कोटी 21 कामांकरीता, वर्ष 2015 मध्ये 150 कोटी 83 लाख रुपये 24 कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक यंत्रणांकडून विकासकामे पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 147 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, क्रीडा संकुलाचे बांधकाम, क्लब हाऊस व स्विमींग पुलाचे बांधकाम, काँक्रीट रोड व नाली बांधकाम, बाजार ओट्याचे बांधकाम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यांची निर्मिती, गुरुदेव नगर येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, सर्वधर्म प्रार्थना सभागृहाचे (मानव समाज मंदीर)बांधकाम, मोझरी गावातील रस्ते आदी कामांचा विकास आराखड्यात समावेश आहे. विकास आराखड्यातील अपूर्ण कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने पूर्ण करावी, असे आदेश त्यांनी दिले.
श्रीक्षेत्र कौंडण्यपूर विकास आराखड्यांतर्गत वर्ष 2012 मध्ये 20 कोटी रुपये 27 कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. आतापर्यंत 13 कामे पूर्ण झाली असून त्यासाठी 16 कोटी 77 लाख रुपये विकासकामांवर खर्च करण्यात आले आहे. आरखड्यांतर्गत पर्यटक विसावा, उपहारगृह , नौकानयन व सौदर्यीकरण अंतर्गत विविध कामे, घाट बांधकाम करणे, बगीचा/बालोद्यान, उद्यान परिसरात सिंचन पध्दत विकसित करणे, व्यापारी संकुल, मंदिर परिसर विकसित करणे, प्रवेशव्दार व रिंगनसोहळा आदी कामे होणार आहेत, अशी माहिती श्री. चौधरी यांनी सादरीकरणातून दिली.
वलगावं येथील संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वर्ष 2012 ला 48 विकास कामांसाठी 37 कोटी 86 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत 35 कोटी 62 लक्ष रुपये खर्चूननिर्वाणभूमीच्या विकासाची कामे झाली आहेत. उर्वरित अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी संबधित यंत्रणांना यावेळी दिले.
विकास आराखड्यांतर्गत येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत. तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पयर्टकांसाठी व भक्तांच्या निवासाची सुविधा उभारण्यात यावी. त्याठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय, बगीचा तसेच महापुरुषांच्या जीवनचरित्र दर्शविणारे पोस्टर लावावेत, अश्या मागण्या आमदार ॲड. ठाकूर यांनी केल्या.