शासन आपल्या दारी मोहिमेच्या विशेष कार्यक्रमात ८५ हजार नागरिकांना देणार लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : दिनांक 27 जून 2023 (जिमाका वृत्त) : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासन आपल्या दारी मोहिमेच्या विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हाेणार असून या कार्यक्रमात जिल्ह्यातील सुमारे 85 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन आहे. सर्व यंत्रणांनी या कार्यक्रमासाठी आपापल्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे नियोजन करावे, अशा सूचना आज पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात शासन आपल्या दारी मोहिमेच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल (नंदुरबार), मंदार पत्की (तळोदा) परिविक्षाधिन सनदी अधिकारी अंजली शर्मा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, शासन आपल्या दारी मोहिमेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अधिक सुलभीकरणातून योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 85 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करताना लाभार्थ्यांची निवड, कार्यक्रम स्थळी त्यांच्यासाठी वाहतुक व्यवस्था, पेयजल अनुषंगिक बाबींचे नियोजन करण्यात यावे. या मोहिमेतून सरकारी योजनांची गतिमान अंमलबजावणी होणार असून सरकार व प्रशासन यांच्याबद्द्लचा विश्वास वाढीस चालना मिळणार आहे. गरज तिथे मदत कराताना सर्व सामान्यांशी  थेट संपर्काची संधी यानिमित्ताने शासन व प्रशासनास लाभणार आहे.

असे असतील कार्यक्रम

शासन आपल्या दारी मोहिमेत रोजगार मेळावा, आरोग्य शिबीर, रक्तदान व अवयव दान शिबीर, चष्मे वाटप, दिव्यांगांना साहित्य वाटप, शिक्षण हक्क कायदा 25 टक्के विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रवेश, कृषी प्रदर्शन, महिलांना ‘सखी किट वाटप, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, शेतकरी ते ग्राहक थेट बाजार आणि बचतगटांचे स्टॉल, विविध सरकारी विभाग व महामंडळाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल, सी. एस. आर. अंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ देणे, नवमतदार नोंदणी यासारखे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

योजनानिहाय लक्ष

महाडिबिटी – कृषी यांत्रिकीकरण योजना, विविध महामंडळांच्या योजना, इ-श्रम कार्ड, स्वनिधी योजना, इमारत बांधकाम मजूर योजना,रेशन कार्ड,आयुष्यमान कार्ड, संजय गांधी व श्रावण बाळ योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड,जात प्रमाणपत्र, रहिवासी, उत्पन्न, जन्म व मृत्यू इत्यादी दाखले, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, बचतगट योजना, गायी, म्हशी व शेळी मेंढी वाटप, सीमांत शेतकरी गट बांधणी- प्रती गाव एक गटनोंद, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, महिलांना शिलाई मशीन वाटप, इतर योजना (विधवा, दिव्यांग, दारिद्र्य रेषेखालील), महालॅब (तपासणी), रोजगार मेळावा, वीज जोडणी, माती परीक्षण, शिकाऊ चालक परवाना, दिव्यांग साहित्य वाटप, महिलांना ‘सखी’ कीट वाटप, डिजिटल इंडिया अंतर्गत शासनाच्या डिजिटल सुविधांची, कृषी प्रदर्शन, शेतकरी ते ग्राहक थेट बाजारपेठ, नव मतदार नोंदणी, मुलींना सायकल वाटप, मनरेगा योजना लाभार्थी, घरकुल योजना (ग्रा.प., न.पा., म न पा), पी.एम. एफ.एम.इ. 33) विवाह नोंदणी यांसारख्या विविध विभागांच्या जनहिताच्या योजनांची जलद गतीने अंमल बजावणार केली जाणार आहे.

0 0 0 0 0 0 0 0 0 0