रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 14

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन

मुंबई, दि. १३ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केले आहे तसेच राज्यातील नागरिकांना डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याचे, विचारांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “डॉ. बाबासाहेबांनी या देशातील अज्ञान, अनीती, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेदासारख्या कुप्रथांविरुद्ध निर्णायक लढा दिला. या देशातील माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क केवळ त्यांच्यामुळे मिळाला. समाजातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क, स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं. डॉ. बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिलं. त्या संविधानानं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारताला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम ठेवण्याचं काम केलं. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेनं गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता प्रत्येक नागरिकाला एका मताचा समान अधिकार दिला. प्रत्येक देशवासियाला मानानं, स्वाभिमानानं जगण्याचा हक्क आणि विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे,” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेबांचा मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणं, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण विकास करणं हेच डॉ. बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरेल. देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला आश्वासक दिशा देण्याचं काम डॉ. बाबासाहेबांनी केलं. त्यांच्यासारखे महामानव आपल्या देशात जन्मले, त्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना दिली हे आपलं भाग्य आहे. डॉ. बाबासाहेब दूरदृष्टीचे नेते होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. ते कायदेतज्ञ, घटनातज्ञ, अर्थतज्ञ होते. लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार होते. डॉ. बाबासाहेबांनी केलेला महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहनाचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेले लढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका; हे सारं देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत. डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचावेत; त्यातून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम रहावी. एकता, समता, बंधूतेचा विचार अधिक मजबूत व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया,” असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या संदेशात केलं आहे.

००००

जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणार – सभापती प्रा. राम शिंदे

नांदेड दि. १३ एप्रिल :- अनेक वर्षापासून जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने पुढील वर्षापर्यंत म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीपर्यत त्यांचे स्मारक उभारणी करण्यात येईल, अशी ग्वाही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.
आज नांदेड येथे मातोश्री मंगल कार्यालय, कौठा येथे धनगर समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. समाजातील वंचित, शोषित,उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी जे-जे करता येईल ते कामे करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार श्रीजया चव्हाण तसेच अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आतापर्यंत धनगर समाजाच्या विकासासाठी संविधानिक मार्गाने जे-जे करता येईल ते सर्व कामे केली आहेत. यापुढेही नियमांच्या चौकटीत राहून संविधानिक मार्गाने वंचित घटकांना न्याय मिळावा यादृष्टीने काम करण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासन सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
समाजाच्या सर्व मागण्या बाबत सकारात्मकपणे शासनाकडे बाजू मांडण्यात येईल. ती कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न – खासदार अशोक चव्हाण
महाराष्ट्रातील तळागाळातील उपेक्षित घटकाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी सर्वानी मिळून काम करणे गरजेचे आहे. उपेक्षित वर्गाला कायदेशिर मार्ग काढून टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे. वंचित घटकांचे  प्रश्न मार्गी लावण्यासाठी संविधानिक मार्गाचा अवलंब करुन प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येईल, असे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.
तसेच शासन स्तरावर नांदेडच्या विकास कामाबाबत मागणी केली असून याबाबत लवकरच शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल ,असे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच महाराष्ट्रात मागासलेल्या मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार आनंदराव बोंढारकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व आमदार महोदयांनी नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या मागण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे केली. तसेच सभापती प्रा. राम शिंदे यांना त्यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्याबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांचा धनगर समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.


00000

नागपूर येथे स्कीन बँक साकारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर, दि. १३ : उमरेड येथील एमपीएम कंपनीमध्ये झालेली घटना ही दुर्देवी आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील सदस्य गमावले त्या कुटुंबासमवेत शासन खंबीरपणे उभे आहे. जे कामगार जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारासाठी कोणतीही कमतरता पडणार नाही. वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास रुग्णांना एअर ॲम्बुलन्सने ऐरोली येथील बर्न हॉस्पीटलमध्ये हलवू या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरेड घटनेतील जखमी कामगारांच्या नातेवाईकांना धीर दिला.

नागपूर येथील ओरियस इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सॉयन्सेस येथे उपचार घेत असलेल्या कामगारांची प्रत्यक्ष भेट देवून त्यांनी डॉक्टरांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, हॉस्पीटलचे क्रीटकल केअर प्रमुख डॉ. ए.एस. राजपूत, स्कीन सर्जन डॉ. एस. जहागीरदार, पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते.

रुग्णांच्या उपचाराची माहिती घेतांना नागपूरमध्ये स्कीन बँकेची नितांत आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना नागपूर येथे अद्ययावत स्कीन बँक साकारण्याबाबत निर्देश दिले. नागपूर येथे मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यातूनही विविध घटनांमध्ये अतीगंभीर असलेल्या रुग्णांना स्कीनची आवश्यकता भासते. याबाबत त्यांनी डॉक्टरांकडून अधीक माहिती घेवून शासन स्तरावरील कार्यवाही जलद गतीने पूर्ण होईल असे सांगितले.

00000

 

 

जनाई उपसा सिंचन योजनेच्या रायझिंग ते बोरकरवाडी तलावापर्यंतच्या पाईपलाईनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

बारामती, दि.१३: जनाई उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या रायझिंग मुख्य पाईपलाईन ते बोरकरवाडी तलावापर्यंत करण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामाचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. भूजलपातळीचा विचार करता नागरिकांनी पाणी वापराबाबत काटेकोरपणे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. कार्यक्रमास महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, जनाई शिरसाई योजनेचे कार्यकारी अभियंता अशोक शेटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता राजकुमार जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, कुतवळवाडी- बोरकरवाडीच्या सरपंच रुपाली भोसले, उपसरपंच राणी बोरकर, टी.सी.एस. फाउंडेशनचे सिद्धार्थ इंगळे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, नागरिकांना पाणी पुरवठा करणे शासनाचे कर्तव्य असून नागरिकांना पाणी मिळण्याकरीता जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचा ४६० कोटी रुपयाचे बंद पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. आज लोकार्पण झालेल्या पाईपलाईनमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.  पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे अत्याधुनिक साधनाचा वापर करुन शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. शासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्ती करण्याकरीता निधीची गरज असते, त्यामुळे नागरिकांनीही नियमितपणे पाणीपट्टी भरुन सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

उपसा सिंचन योजनेसाठीवर सौर पॅनल बसविण्यात येणार

आगामी काळात जनाई शिरसाई आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी सौर पॅनल बसविण्यात येणार आहेत. सौर उर्जेद्वारे निर्मिती होणारी वीज महावितरण कंपनीला दिली जाणार असून यामुळे योजनेच्या वीज देयकात कपात होईल, त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपट्टीतही लाभ होईल, अशी माहिती देखील श्री. पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी पुरवठा योजनांची पाहणी

श्री. पवार यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणाऱ्या मुर्टी व इतर ७ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आणि मुर्टी व लोणी भापकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सस्तेवाडी येथील तलावाच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून परिसरातील ११ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे, नागरिकांना पूर्णवेळ पाणी पुरवठा होण्यासाठी महावितरणने वीजेच्या फिडरचे काम वेळेत पूर्ण करावे. पाईपलाईनमधून पाणी गळती होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. तालुक्यात रेल्वे, रस्ते, पाणी, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रात विविध विकास कामे सुरु असून ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी श्री. पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

नागरिकांना पक्की घरे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

राज्यात २० लाख घरे मंजूर करण्यात आली असून पुणे विभागातील ३० हजारपैकी बारामती तालुक्यात ५ हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक दूर्बल घटकातील कुटुंबाना पक्की व हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

नागरिकांना विश्वासात घेऊनच सुपा ग्रामपंचायत प्रारुप विकास आराखडा अंतिम करण्यात येईल.

नागरिकांच्या मुलभूत गरजा भागविण्याच्यादृष्टीने सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता विकास आराखडा तयार करण्यात येतो. यामध्ये रस्ते, शाळा, भाजी मंडई, स्मशानभूमी, दफनभुमी, मंदिरे, घनकचरा व्यवस्थापन केंद्र, महावितरण केंद्र, दवाखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, घरकुल योजना, मैदान, क्रीडांगण आदी पायाभूत सुविधा उभारण्याकरीता आरक्षण निश्चित करण्यात येते. आगामी सन २०४६ मधील लोकसंख्येचा विचार करून सुपा ग्रामपंचायतीचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने नागरिकांकडून प्राप्त सूचना व हरकतींच्या सुनावणीदरम्यान नागरिकांना विश्वासात घेवून प्रारुप आराखडा अंतिम करण्यात येईल. संपादित केलेल्या जमिनीचा नागरिकांना योग्य तो मोबादला देण्यात येईल, याकामी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

0000

विद्यार्थ्यांनो, पुस्तके वाचा, स्वतःला सक्षम बनवा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सल्ला

बारामती, दि. १३ : ‘विद्यार्थ्यांनो, पुस्तके ही तुमची खरी मित्र असून ती विचार करायला शिकवतात, कल्पनाशक्तीला पंख देण्यासोबत नवीन जगाला जोडण्याचे काम करीत असतात, पुस्तकांमुळे व्यवहारिक ज्ञान वाढण्यासोबतच नवीन संधीचे दरवाजे उघडण्याचे कामदेखील होते, त्यामुळे अधिकाधिक पुस्तके वाचा आणि त्या माध्यमातून स्वतःला सक्षम बनवा’, असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला.

पंचायत समिती सभागृहात येथे आयोजित आरोग्य विभाग व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विद्यार्थ्यांना चष्मे आणि पुस्तक वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक राजीव मेहता, डॉ.संतोष भोसले आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, पालकांचा पाठिंबा, विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती आणि शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान यामुळे यशाचे शिखर गाठण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांच्या इच्छाशक्तींवर विश्वास दाखवून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनीही ध्येय गाठण्याकरिता प्रचंड मेहनत आणि स्वतःला समर्पित केले पाहिजे. शिक्षकांनी काळानुरुप अद्ययावत ज्ञान देत मुलांचे भविष्य उज्ज्वल केले पाहिजे. यामाध्यमातून भारत देश महासत्ता होण्याकरीता उद्याची सक्षम पिढी घडविण्याचे काम करावे.

समाजातील गरजू व्यक्तीला लाभ देण्याचा प्रयत्न

समाजातील गरजू व्यक्तीला लाभापासून आर्थिक बाबीमुळे वंचित राहू नये, याकरीता विविध सामाजिक संस्थेची मदत घेवून काम करण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील आरोग्य विभागामार्फत ३० हजार विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली, यामधून १ हजार ५१२  विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आढळून आला. त्या सर्व विद्यार्थ्यांना रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उच्च प्रतीचे चष्मे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अंगी वाचनाची गोडी निर्माण व्हावी याकरिता जिल्हा परिषद व शासकीय अनुदानित शाळांना ५० हजार पुस्तके देण्यात येणार आहेत. दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, अशांना या चष्म्यामुळे सुलभ पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. चष्मे आणि पुस्तकांकडे साधने म्हणून न बघता यशाची पहिली पायरी म्हणून पहावे. याचा उपयोग करुन तुमच्या स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न करा, असेही आवाहन त्यांनी केले.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत बारामती येथे २३ कोटी ५० लाख रुपयांचे अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्यात येत आहे. याचा बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, फलटण या तालुक्यातील विद्यार्थी, नागरिकांना लाभ होणार आहे, त्यामुळे रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टने पुस्तके दान करण्याची सूचना श्री. पवार यांनी केली.

श्री. मेहता यांनी मनोगत व्यक्त केले व डॉ. खोमणे यांनी प्रास्ताविक केले.

0000

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पुढील पाच वर्षात राज्यात दरवर्षी वीज बीलाची रक्कम कमी होणार
  • वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन व रोजगार निर्मिती होणार

वर्धा, दि. १३ : डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. तसेच वर्धा जिल्ह्यात लोअर वर्धा प्रकल्प, वाढोणा-पिंपळखुटा आदी सिंचन प्रकल्पांद्वारे शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करून देऊ आणि जिल्ह्यातून जाणा-या समृध्दी महामार्गावरील नोडवर एमआयडीसी उभारुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह ७२० कोटींच्या विकास कामांचे  ई-लोकार्पण व भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. गृह (ग्रामीण) राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार सर्वश्री दादाराव केचे, सुमीत वानखेडे, समीर कुणावर, राजेश बकाने,माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली आहे. शेतीसाठी १२ तास विजेची शेतक-यांची मागणी होती. यादृष्टीने राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरु केली असून डिसेंबर २०२६ पर्यंत  ८० टक्के शेतकऱ्यांना ३६५ दिवस दिवसाला १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राज्य शासनाने २०२५ ते २०३० पर्यंत राज्यातील वीज वापरकर्त्यांचे वीज बील दरवर्षी कमी करण्याचे नियोजन व तशी कार्यवाही सुरु केली आहे. तसेच ३०० युनीट पर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून  मोफत वीज देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदार संघात विविध महत्वाच्या विकास कामांचे लोकार्पण झाले आहे. याद्वारे या भागातील विकासाला चालना मिळेल. तसेच येत्या काळात या भागातील लोअर वर्धा प्रकल्प आणि वाढोणा -पिंपळखुटा उपसा सिंचन प्रकल्प कार्यान्वीत होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. या सिंचन प्रकल्पांद्वारे या भागातील शेतीला मुबलक पाण्यासोबत मोफत वीज उलब्ध होणार आहे. लोअर वर्धा प्रकल्पावर ५०० मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. तसेच वाढोणा-पिंपळखुटा उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गामुळे विकासाला गती आली आहे. तसेच येत्या काळात वर्ध्यातून सुरु होणाऱ्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग आणि सिंदी येथील ड्रायपोर्टमुळे जिल्हा मध्यभारताचे लॉजिस्टीक केंद्र म्हणून उदयाला येत आहे. या जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील  विरुळ नोडला राज्य शासनाकडून लवकरच मान्यता देऊन येथे एमआयडीसी उभारली जाणार आहे. या माध्यमातून उद्योगासाठी इको सिस्टीम तयार होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत  महाराष्ट्रासाठी १६.५ लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून यातील ७ लाख कोटींचे करार विदर्भासाठी करण्यात आले आहे. वर्ध्यासह विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही या माध्यमातून मोठी गुंतवणूक येणार आहे. गडचिरोली जिल्हा स्टील कॅपीटल म्हणून नावारुपास येत आहे. येत्या काळात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये लोहखनीजावर आधारीत उद्योग उभारणीसाठी राज्य शासनाने विशेष सवलत दिली असून या भागात मोठ्याप्रमाणात गुंतवणूकीचे प्रस्ताव शासनाकडे आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे वर्ध्यासह विदर्भातील दहा जिल्ह्यामधील काही दुष्काळग्रस्त भाग सुजलाम सुफलाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द धरणातील ६२ टीएमसी सांडव्याद्वारे नव्याने ५५० कि.मी.ची नदी तयार करण्यात येणार आहे. यासाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठीच्या सर्व मंजुरी देण्यात आल्या असून  योजनेचा अंतिम आराखडा तयार होत आहे. यावर्षा अखेरी किंवा पुढील वर्षाच्या सुरवातीला या योजनेचे काम सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्वी मतदार संघातील तीन तालुक्यांमधील ७२० कोटींच्या विविध ११ विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. या माध्यमातून वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे, पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितले. राज्यातील ४७६ सरकारी शाळा या आदर्श शाळा बनविण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील आदर्श शाळेचा शुभारंभ  १४ एप्रिल २०२५  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने सुरु होणार असल्याचे सांगून शिक्षण क्षेत्रात या उपक्रमाद्वारे सकारात्मक बदल होणार असल्याचे ते म्हणाले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील तीन शाळांचा यात  समावेश असल्याचेही ते म्हणाले. करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

खासदार अमर काळे, आमदार सुमित वानखेडे, आमदार दादाराव केचे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी प्रास्ताविक केले तर आर्वी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांनी आभार मानले.

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह १० ई – लोकार्पण व भूमिपूजन

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारततीचे लोकार्पण झाले आणि १० महत्त्वाचे ई लोकार्पण व भूमिपूजनही झाले. त्यांनी आर्वी उपसा सिंचन योजनेचे                      ई लोकार्पण, गांधी विद्यालय आर्वी येथील नवीन इमारतीचे ई-लोकार्पण, आर्वी शहरातील नवीन स्विमींग पुलचे ई-लोकार्पण, आर्वी शहरातील अंतर्गत रस्त्याचे ई-भूमीपूजन,आर्वी शहरातील सारंगपूरी तलावाचे संवर्धन व सौदर्यीकरण ई-भूमीपूजन, आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील शंभर खाटाच्या रुग्णालयाच्या इमारतीचे ई-भूमीपूजन, पंतप्रधान सुर्यघर मोफत विज योजनेचे ई-लोकार्पण (सौरग्राम नेरी मिर्झापुर, तह- आर्वी), एमआयडीसीमध्ये कार्यांवित एचएएम टप्पा-२ अंतर्गत कारंजा तालुक्यातील रस्त्याचे ई-भूमीपूजन आणि १०० दिवसाच्या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा शासकीय वाहनांचे लोकार्पण केले.

0000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना

मुंबई, दि. १३ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त उद्या सोमवार, दि. १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एका माहितीपटासह, चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमांवरून तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या दिनानिमित्ताने महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी १३४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने उद्या सकाळी ११ वाजता ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण आणि दुपारी १ वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे दुपारी १.३० वाजता प्रसारण करण्यात येणार आहे.

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’, या माहितीपटाचे एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण एक्स या समाजमाध्यमावर होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाविषयी..

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटात डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. हा माहितीपट १७ मिनिटांचा आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे, तर जी.जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे, तर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाविषयी…

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाची निर्मिती सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य या चित्रपटातून समजते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामुट्टी यांनी, तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले आहे. या चित्रपटाचे सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर, फोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

०००

क्रीडा शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील – प्रा.राम शिंदे

अहिल्यानगर, दि.१३ – केवळ पुस्तकांचा अभ्यास करून नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती घडवण्यामध्ये क्रीडा शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरुण पिढीच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

शिर्डी येथील सप्तपदी मंगल कार्यालय येथे  शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नामदेव शिरगावकर, डॉ.अरुण खोडसकर, विश्वनाथ पाटोळे, राजेंद्र कोतकर, संजय चव्हाण, शिवदत्त ढवळे, ज्ञानेश काळे, संजय पाटील, जालिंदर आवारी, डॉ. आनंद पवार,  क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे आदी उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले, क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण शिकवतात. मैदानावर शिकलेले धडे हे जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जाताना उपयोगी पडतात. नियमित व्यायाम, योग्य आहार, तंदुरुस्ती यांचे महत्त्व मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे क्रीडा शिक्षक करत असतात. क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखून त्यांना योग्यदिशेने मार्गदर्शन करतात. अनेक खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. मैदानावर संघर्ष करताना हार मानू नये, प्रयत्न करत राहावे, हे शिकवणारे क्रीडा शिक्षकच खरे जीवनगुरु असल्याचे ते म्हणाले.

शाळांमध्ये क्रीडा शिक्षक केवळ खेळ शिकवणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार असतात. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला योग्य वळण लावण्यासाठी त्यांचे योगदान अतुलनीय  आहे. आजच्या धकाधकीच्या व संगणकीय युगात शरीराची हालचाल कमी झालेली आहे. खेळ व व्यायामामुळे जीवनात आनंद, उज्ज्वल भविष्य घडण्याबरोबरच आरोग्य सुदृढ राहते.  प्रत्येक नागरिक सुदृढ असेल तरच आपले राज्य व देश तरुण राहील.यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम, योगाची सवय  अंगिकारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या माध्यमातून विचारमंथन व्हावे. क्रीडा शिक्षकांनी संघटित होऊन त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असेही प्रा.शिंदे यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ पाटोळे यांनी केले.

यावेळी राजेंद्र कोतकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ. जितेंद्र लिंबकर, पुरुषोत्तम उपवर्त, अमोल जोशी, राजेश जाधव,अप्पासाहेब शिंदे,सुनील जाधव उपस्थित होते.

0000

‘जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न

मुंबई, दि. १३:  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने दि. १३ एप्रिल रोजी ‘जय भीम पदयात्रा’ चे आयोजन करण्यात आले. प्रथमच देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झालेली ही ऐतिहासिक पदयात्रा ही राष्ट्रीय उत्सवाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरली.मुंबईतील पदयात्रेचे नेतृत्व केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी केले. या पदयात्रेमध्ये २००० पेक्षा अधिक ‘मायभारत’च्या विविध स्वयंसेवकांनी भाग घेतला. ही पदयात्रा नरिमन पॉईंट येथून सुरू होऊन मंत्रालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत झाली. ही पदयात्रा सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचे प्रतीक ठरली.

यावेळी आयोजित कार्यक्रमात श्रीमती खडसे म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे. या थोर महापुरुषाने आपल्या देशाला दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांनी समाजाला नवदिशा दिली, याचा अभिमान आपल्याला आहे. त्यांची जयंती साजरी करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवणं आणि पुढे नेणं हे अधिक महत्त्वाचं आहे.

यावेळी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, आमदार आणि युवकांचा सत्कार करण्यात आला. पदयात्रेत डॉ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार मांडणारे ‘श्रद्धांजली कोपरे’, सामाजिक न्यायावर आधारित थेट रस्त्यांवरील सांस्कृतिक सादरीकरण, आणि ‘प्रतिज्ञा बिंदू’ यांसारख्या उपक्रमांनी वातावरण अधिक प्रेरणादायी केले. कार्यक्रमाचा समारोप मंत्रालयाजवळील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात सामूहिक स्वच्छतेने करण्यात आला. ही प्रतीकात्मक क्रिया देशभरात विविध शहरांमध्येही पार पडली.

जिल्हास्तरावर देखील स्वच्छता उपक्रम आणि पुष्पांजली  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.‘जय भीम पदयात्रा’ ही भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून सुरू झालेल्या 24 मासिक पदयात्रांपैकी नववी पदयात्रा होती. या पदयात्रा भारतीय युवांना  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांशी जोडण्याचे माध्यम ठरत आहेत.

मुंबईतील या पदयात्रेमध्ये  कौशल्य ,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र व गोवा येथील एनवायकेसचे राज्य संचालक प्रकाशकुमार मनुरे, एएसएसचे महाराष्ट्र प्रादेशिक संचालक अजय शिंदे तसेच क्रीडा व युवक कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने देशभरातील तरुणांना या प्रेरणादायी चळवळीत सहभागी होण्यासाठी www.mybharat.gov.in या मायभारत पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले असून, लोकशाही, स्वाभिमान आणि ऐक्याच्या मार्गावर एकत्र चालण्याचे आवाहनही केले आहे.

0000

 

०००

घटनाकार आणि समतेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६) यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू कॅन्टोन्मेंट येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रातील सातारा येथे पूर्ण केले आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यांचे शिक्षण मोठ्या प्रमाणात भेदभाव सहन करून झाले, त्यांच्या आत्मचरित्रात्मक नोंद ‘वेटिंग फॉर अ व्हिसा’ मध्ये, त्यांनी त्यांच्या शाळेतील सामान्य पाण्याच्या नळातून पाणी पिण्याची परवानगी कशी नव्हती याची आठवण करून दिली, “नो शिपाई, नो वॉटर” असे लिहिले आहे.

डॉ. आंबेडकर यांनी १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात बीए पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे १९१३ मध्ये त्यांना बडोदा राज्याचे तत्कालीन महाराजा (राजा) सयाजीराव गायकवाड यांनी अमेरिकेतील न्यू यॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात एमए आणि पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. १९१६ मध्ये त्यांचा पदव्युत्तर प्रबंध “द अॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी” या शीर्षकाचा होता. त्यांनी “द इव्होल्यूशन ऑफ प्रांतीय वित्त इन इंडिया: अ स्टडी इन द प्रांतीय विकेंद्रीकरण ऑफ इम्पीरियल फायनान्स” या विषयावर पीएचडी प्रबंध सादर केला.

कोलंबियानंतर, डॉ. आंबेडकर लंडनला गेले, जिथे त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) मध्ये नोंदणी केली आणि कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला. तथापि, निधीअभावी त्यांना १९१७ मध्ये भारतात परतावे लागले. १९१८ मध्ये ते मुंबई (पूर्वीचे मुंबई) येथील सिडेनहॅम कॉलेजमध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. या काळात त्यांनी साउथबरो समितीला सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची मागणी करणारे निवेदन सादर केले.

१९२० मध्ये, कोल्हापूरच्या छत्रपती शाहूजी महाराजांच्या आर्थिक मदतीमुळे, एका मित्राकडून घेतलेले वैयक्तिक कर्ज आणि भारतात असतानाच्या त्यांच्या बचतीमुळे, डॉ. आंबेडकर त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला परतले. १९२२ मध्ये त्यांना बारमध्ये बोलावण्यात आले आणि ते बॅरिस्टर-अॅट-लॉ बनले. त्यांनी एलएससीमधून एमएससी आणि डीएससी देखील पूर्ण केले. त्यांचा डॉक्टरेट प्रबंध नंतर “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी” या नावाने प्रकाशित झाला.

भारतात परतल्यानंतर, डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा (बहिष्कृतांच्या कल्याणासाठी समाज) स्थापन केली आणि भारतीय समाजातील ऐतिहासिकदृष्ट्या पीडित जातींना न्याय आणि सार्वजनिक संसाधनांमध्ये समान प्रवेश मिळावा यासाठी १९२७ मध्ये महाड सत्याग्रह सारख्या सामाजिक चळवळींचे नेतृत्व केले. त्याच वर्षी, त्यांनी मुंबई विधान परिषदेत नामांकित सदस्य म्हणून प्रवेश केला.

त्यानंतर, डॉ. आंबेडकरांनी १९२८ मध्ये भारतीय वैधानिक आयोगासमोर, ज्याला ‘सायमन कमिशन’ म्हणूनही ओळखले जाते, घटनात्मक सुधारणांवरील आपले निवेदन सादर केले. सायमन कमिशनच्या अहवालांमुळे १९३०-३२ दरम्यान तीन गोलमेज परिषदा झाल्या, जिथे डॉ. आंबेडकरांना त्यांचे निवेदन सादर करण्यासाठी आमंत्रित केले गेले.

१९३५ मध्ये, डॉ. आंबेडकर यांची मुंबईतील सरकारी कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली, जिथे ते १९२८ पासून प्राध्यापक म्हणून अध्यापन करत होते. त्यानंतर, त्यांना व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेत कामगार सदस्य (१९४२-४६) म्हणून नियुक्त करण्यात आले.

१९४६ मध्ये, ते भारताच्या संविधान सभेवर निवडून आले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर, ते संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी भारताच्या संविधानाच्या मसुद्याच्या प्रक्रियेचे नेतृत्व केले. संविधान सभेचे सदस्य महावीर त्यागी यांनी डॉ. आंबेडकरांचे वर्णन “मुख्य कलाकार” असे केले ज्यांनी “स्वतःचा कुंचला बाजूला ठेवून जनतेला पाहण्यासाठी आणि त्यावर टिप्पणी करण्यासाठी चित्र अनावरण केले”. संविधान सभेचे अध्यक्ष आणि नंतर भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती बनलेले डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले: “अध्यक्षपदावर बसून आणि दिवसेंदिवस कामकाज पाहताना, मला जाणवले की मसुदा समितीचे सदस्य आणि विशेषतः तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या अस्वस्थ प्रकृती असूनही ज्या उत्साहाने आणि भक्तीने काम केले आहे, ते इतर कोणीही करू शकत नाही. जेव्हा आम्ही त्यांना मसुदा समितीवर ठेवले आणि त्यांचे अध्यक्ष केले तेव्हा आम्ही कधीही असा निर्णय घेऊ शकलो नाही जो इतका योग्य होता किंवा असू शकतो. त्यांनी केवळ त्यांच्या निवडीचे समर्थन केले नाही तर त्यांनी केलेल्या कामात चमक वाढवली आहे.”

१९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते राज्यसभेचे सदस्य झाले. त्याच वर्षी त्यांना कोलंबिया विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली. १९५३ मध्ये, त्यांना हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाकडून आणखी एक मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली.

१९५५ मध्ये दीर्घ आजारामुळे डॉ. आंबेडकरांची प्रकृती खालावली. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे झोपेतच त्यांचे निधन झाले.

0000

रणजितसिंह राजपूत,

जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

 

ताज्या बातम्या

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाबळेश्वर दौऱ्याप्रसंगी दिली विविध ठिकाणांना भेट

0
सातारा, दि.२०: पर्यटन, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे महाबळेश्वर दौऱ्यावर होते. यावेळी...

जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

0
नागपूर, दि २० : विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या; मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

0
नागपूर, दि. २० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणासाठी विविध विभागाकडे उचित...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण

0
नागपूर, दि. २० : नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्री...

पिंक ई-रिक्षा हे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २० : महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विविध निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांद्वारे...