गुरूवार, जुलै 17, 2025
Home Blog

विधानसभा कामकाज

प्रवासी वाहनांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर प्रदेशासाठी १८००२२०११० टोल फ्री क्रमांक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १७ : शहरातील ऑटोरिक्षा,टॅक्सी,ओला-उबर,प्रवासी वाहने तत्सम प्रवासी वाहनांसंदर्भात भाडे नाकारणे, प्रवाशांशी उध्दटपणे वागणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, बॅज प्रदर्शित न करता वाहन चालविणे, अतिरिक्त भाडे आकारणे अशा प्रकारच्या प्रवाशांच्या तक्रारींचे निरसन करता यावे. बेशिस्त चालकांविरुध्द कारवाई करता यावी, याकरिता संपूर्ण मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी प्रवासी टोल फ्री क्रमांक १८००-२२०-११० सुरु करण्यात आला आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निवेदनाद्वारे विधानसभेत सांगितले.

परिवहन मंत्री श्री सरनाईक म्हणाले, याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम), अंधेरी येथे नियंत्रण कक्ष २४ तास सुरु आहे. परिवहन विभागामार्फत प्रथमच अशाप्रकारे नागरिकांसाठी सेवा सुरु करण्यात येत आहे. या कक्षाला प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयास ई-मेलद्वारे अवगत करण्यात येते. दोषी आढळलेल्या वाहन मालकांना नोटीस पाठविण्यात येऊन कारवाई करण्यात येते. त्यांची सुनावणी घेऊन दोषी वाहनांची नोंद ब्लॅकलिस्टमध्ये घेण्यात येते. ब्लॅकलिस्टमध्ये नमूद वाहनांवर दंडात्मक कारवाई होईपर्यंत वाहनांसंबंधीचे पुढील कोणतेही कामकाज करण्यात येत नाही.

ही कारवाई यापुढे देखील प्रभावीपणे चालू राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांनी ऑटोरिक्षा, टॅक्सी, ओला-उबर,प्रवासी बसेस सारख्या प्रवासी वाहनांसंदर्भात काही मदत हवी असल्यास या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. मुंबई महानगरातील वाहतूकीबाबत सुलभ सेवा निर्माण करण्याकरिता नागरिकांनी या टोल फ्री सेवेचा लाभ घेऊन परिवहन विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १७ : आता अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत घेता येणार आहे. ज्या अनाथ बालकांचे/कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के लाभ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

अनाथ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत लागू असून, वार्षिक उत्पन्न ८ लाखांपर्यंत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना ही सवलत मिळेल. ही योजना सर्व संस्थांतील नव्याने प्रवेश घेतलेल्या व सध्या शिकत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस, शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनाथ बालकांना नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या (अर्जाचे नुतनीकरण केलेल्या) अनाथ बालकांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के लाभ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

अनाथ मुलांना योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लागू राहील, असेही त्यांनी सांगितले.

अनाथ मुला-मुलींना सामाजिक आरक्षणातून त्यांच्या सामाजिक प्रवर्गाच्या शिष्यवृत्ती योजनेचा किंवा अनाथ आरक्षणाअंतर्गत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क याकरिता १०० टक्के लाभ या योजनेचा लाभ त्यांच्या ऐच्छिक विकल्पानुसार घेता येईल. तथापि, दोन्ही योजनेंचा लाभ एकाच वेळी घेता येणार नाही.  शिक्षण शुल्काअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा शिक्षण संस्थेमार्फत अनाथ विद्यार्थ्यास उपलब्ध करून देण्यात येतील.

अनाथांसाठी आरक्षणः शासकीय, निमशासकीय तसेच शासकीय अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी १% आरक्षण लागू करण्यात आले आहे.

अनाथांना दिव्यांगाच्या धर्तीवर शिक्षण व शासकीय (निमशासकीय तसेच शासन अनुदानित संस्थांमधील) पद भरतीमध्ये उपलब्ध पदांच्या १ टक्का इतके आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

मुंबई, दि. 17 : बर्कले येथील जागतिक कीर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार केला आहे. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रतिनिधी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण बी, महापारेषणचे संजीव कुमार आदी उपस्थित होते. श्रीमती शुक्ला आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाचे वरिष्ठ सल्लागार मोहित भार्गव यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या करारामुळे महाराष्ट्रातील उर्जा क्षेत्रात संशोधन, तांत्रिक नवकल्पना आणि धोरणात्मक सहकार्याला गती मिळणार आहे. उर्जेचा स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणारा पुरवठा, ऊर्जा साठवणूक उपाय, वीज बाजार रचना, ग्रीड प्रसारण प्रणालीतील सुधारणा, हवामानाशी जुळवून घेणारी धोरणे आणि प्रशिक्षण कार्यक्रम या क्षेत्रांमध्ये संयुक्त काम होणार आहे.

“कॅलिफोर्निया विद्यापीठासारख्या संस्थेच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात उर्जा क्षेत्रात जागतिक दर्जाचे संशोधन आणि नवसंशोधनाला चालना मिळेल. या सामंजस्य करारामार्फत उर्जा साठवणूक, वीज बाजार, प्रसारण व्यवस्था आणि हवामान बदलाशी जुळवून घेणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता वृद्धी यांना चालना मिळणार आहे. स्वच्छ, विश्वासार्ह आणि शाश्वत उर्जेच्या दिशेने सहकार्याचा नवा अध्याय सुरू होत आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र सरकार आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले यांच्यातील हे सहकार्य परस्पर विश्वास, समानता आणि सामूहिक हिताच्या तत्त्वांवर आधारित असून, राज्याच्या उर्जा क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार स्थानिक उपाययोजना विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

हा करार लवचिक स्वरूपाचा असून त्यामुळे भविष्यातील प्रकल्पांनुसार सहकार्याचे दरवाजे खुले राहतील. या करारामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे आणि प्रशासन यांना नवसंशोधन, क्षमता वृद्धी व प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यामुळे पर्यावरणस्नेही आणि शाश्वत उर्जेच्या दिशेने राज्याचा प्रवास अधिक गतिमान होईल, असा विश्वास ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी व्यक्त केला.

या सामंजस्य करारामध्ये खालील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ज्ञानसंपादन, संशोधन आणि प्रशिक्षणाची संधी मिळणार

  • स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या वीजेचा विकास
  • उर्जा साठवण  तंत्रज्ञानावर संयुक्त संशोधन
  • वीज मार्केटची रचना आणि धोरण निर्मिती
  • ग्रीड प्रसारण क्षेत्रातील नवोन्मेष
  • हवामान अनुकूलता (climate resilience) उपाययोजना
  • कौशल्यविकास आणि प्रशिक्षण उपक्रम

00000

स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी : स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये मिरा-भाईंदर मनपा देशात प्रथम

नवी दिल्ली, 17 : स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात मिरा-भाईंदर महानगरपालिकेने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावत राज्याचा नावलौकिक वाढविला आहे. 

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण नगरविकास मंत्री मनोहर लाल आणि राज्यमंत्री तोखन साहू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रधान सचिव नगरविकास विभाग-2 डॉ. के.एच.  गोविंदराज, राज्य मिशन डायरेक्टर  स्वच्छ महाराष्ट्र (शहरी) नवनाथ वाठ उपस्थित होते.

स्वच्छ शहरांच्या मूल्यांकनामध्ये (ठाणे जिल्हा) मिरा भाईंदर महानगर पालिकेने 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान मिळवले आहे. हा पुरस्कार नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह महानगरपालिकेचे आयुक्त राधा बीनोद शर्मा त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले.

कराड नगरपालिका देशात दुसरी

कराड नगरपालिकाने 50 हजार ते 3 लाख लोकसंख्येच्या गटात देशात दुसरे स्थान पटकावले आहे. हा पुरस्कार राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्यासह मुख्य अधिकारी प्रशांत वटकर यांनी स्वीकारला

नवी मुंबई महानगरपालिकेने सुपर स्वच्छ लीग सिटी पुरस्कार पटकावला

10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गटात ( ठाणे जिल्हा )  नवी मुंबई महानगरपालिकेने “सुपर स्वच्छ लीग सिटी” पुरस्कार पटकावला आहे. पुरस्कार राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्यासह आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी स्वीकारला.

50,000 ते 3 लाख लोकसंख्येच्या गटात (पुणे जिल्हा) लोणावळा नगरपालिकाने, 20,000 ते 50,000 लोकसंख्येच्या गटात ( सांगली जिल्हा) विटा नगरपालिकाने, ( पुणे जिल्हा) सासवड नगरपालिका आणि ( अहिल्यानगर जिल्हा)देवळाली प्रवरानगर नगरपालिका , तर 20,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात ( सातारा) पाचगणी नगरपालिका आणि ( कोल्हापूर)पन्हाळा नगरपालिका  या शहरांनी सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान मिळवले.

(पुणे जिल्हा) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देशात सातवा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 7 स्टार गार्बेज फ्री सिटी आणि वॉटर प्लस ही दोन्ही मानांकनंही मिळवली आहेत. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महानगरपालिका, नगरपालिकांच्या टीमसह पुरस्कार स्वीकारले.

मिरा-भाईंदर मनपाची अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली

महाराष्ट्राने कचरा व्यवस्थापन, स्रोत पातळीवरील विलगीकरण, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून स्वच्छतेच्या दिशेने उल्लेखनीय कार्य केले आहे. मिरा-भाईंदरने अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली, मशीनद्वारे कचरा संकलन आणि नागरिकांमध्ये जनजागृती घडवून हे यश संपादन केले. पिंपरी-चिंचवडने कचरा मुक्त शहर व वॉटर प्लस प्रमाणपत्र मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.

स्वच्छता सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा पाया

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत सर्व विजयी शहरांचे अभिनंदन केले. स्वच्छता ही केवळ शारीरिक आरोग्याचा नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक करत ही चळवळ महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी ठरत असल्याचे सांगितले. सफाईमित्रांचे योगदान उल्लेखनीय असून, मॅनहोलऐवजी मशीन-होलचा वापर वाढवण्याचेही त्यांनी आवाहन केले.

स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 अंतर्गत देशभरातील 4,500 हून अधिक शहरांचे 10 महत्त्वपूर्ण निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये कचरा संकलन, स्रोत पातळीवरील विलगीकरण, पर्यावरणपूरक उपाययोजना, नागरिक सहभाग, आणि स्वच्छतेसंदर्भातील जनजागृती यांचा समावेश होता. “रिड्यूस, रीयूज, रीसाइकल” ही या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना होती. एकूण 3,000 हून अधिक मूल्यांकनकर्त्यांनी 45 दिवसांच्या कालावधीत 11 लाखांहून अधिक घरे आणि परिसरांचे सर्वेक्षण केले असून 14 कोटी नागरिकांनी त्यात सहभाग नोंदविला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम 2016 पासून केंद्र शासनाने सुरू केला. हा उपक्रम शहरी स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ बनला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील विविध शहरांनी दाखवलेली कामगिरी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत असून, स्वच्छतेच्या दिशेने ही वाटचाल भविष्यातही वेगाने सुरू राहील, अशी अपेक्षा नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केली.

00000

विधानसभा प्रश्नोत्तरे

गोंदिया जिल्हा रुग्णालयातील अडचणींबाबत तात्काळ बैठक घेणार – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १७ : गोंदिया जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या रुग्णालयात ज्या सुविधा सध्या उपलब्ध नाहीत, त्या आरोग्यसुविधा तात्काळ उपलब्ध होणे व इतर अडचणींबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य राजकुमार बडोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या रुग्णालयात सोनोग्राफी, डायलेसिस यंत्रणा व इतर वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. थॅलेसिमिया व सिकलसेल रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रक्तघटक पुरवठ्याबाबतही तातडीने उपाययोजना केली जात आहे. गंगाबाई रक्तपेढी ही गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असून, रक्तघटक वेगळे करणारे (सेपरेशन) यंत्र सध्या कार्यान्वित नाही. या मशीनसाठी आवश्यक असलेले लायसन्स सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन व राज्य शासनाच्या ‘एफडीए’ विभागाच्या संयुक्त तपासणीनंतर दिले जाते. ही तपासणी १ जुलै २०२५ रोजी होणार असून, त्यानंतर एका महिन्यात लायसन्स मिळेल.गोंदियामध्ये नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. यापुढे अधिष्ठाता यांच्याकडेच संपूर्ण कार्यभार असेल, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तो दिला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

आशा, स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मानधनाची प्रक्रिया सुरू – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १७ : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचे मानधन केंद्र आणि राज्य शासनाकडून देण्यात येते. केंद्र शासनाचा निधी आला नसल्याने मधल्या काळात मानधन प्रलंबित राहिले होते. आता निधी प्राप्त झाला असून मानधन वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले

विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

राज्य शासनाकडील मानधन नियमित देण्यात येते.  केंद्र शासनाकडून जानेवारी २०२५ पासूनचा निधी येणे प्रलंबित होते. त्यामुळे दरम्यानच्या कालावधीत मानधन वितरित झाले नाही. दिनांक ४ जून २०२५ रोजी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रलंबित मानधन वितरण प्रक्रिया सुरू आहे. या मानधना संदर्भात आर्थिक तरतूद उपलब्ध आहे.

000

डॉक्टर व कर्मचारी यांना निवास सुविधा देण्यासाठी कालबद्ध आराखडा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १७ : राज्यातील आरोग्य सेवांमध्ये कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटलसोबतच निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने कालबद्ध आराखडा तयार केला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफसाठी नियमित उपस्थिती बंधनकारक करण्यात आली असून, बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सेवेसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक गोष्टीची नोंदणी सक्तीने करण्यात येत असून, गैरप्रकार आढळल्यास चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. माढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मानेगाव येथील मुख्य इमारत व कर्मचारी निवास्थान इमारती जीर्ण झाल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यानुसार या आरोग्य संस्थेचे बांधकाम पाडण्यास हरकत नसल्याबाबत विभागीय अधीक्षक अभियंता (सा.बां.वि.) यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्त करुन घेऊन इमारत बांधकाम निर्लेखित करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. या आरोग्य संस्थेच्या जीर्ण इमारतींचे बांधकाम निर्लेखित करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी नवीन इमारत बांधकाम करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाकरिता नवीन अभ्यासक्रम ऑगस्टपासून सुरू होणार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १७ : सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळ आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मत्स्यक्षेत्रातील महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण आयटीआय मार्फत ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात येईल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळासाठी लवकरात लवकर अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी मागणी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बैठकीत केली.

विधानभवन येथे वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, पालघरच्या जिल्हाधिकारी  इंदूमती जाखड यावेळी उपस्थित होत्या.

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) या भारताच्या कौशल्य विकास व्यवस्थेचा कणा आहेत, ज्या व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम युवक घडवतात. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उ‌द्योजकता विभागाकडून पीपीपी (PPP) (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) मॉडेलनुसार आयटीआय (ITI) संस्थांना जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचा उ‌द्देश आहे.  हा सामंजस्य करार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत स्किल इंडिया मिशन, महाराष्ट्र आयटीआय आधुनिकीकरण धोरण 2025 आणि शाश्वत विकास उद्दीष्ट (Sustainable Development Goals) यांच्याशी सुसंगत आहे. या निर्णयामुळे रोजगार निर्मिती होवून आयटीआय काळानुरूप प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाली आहे.

जेएनपीटी, वाढवण बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता  मंत्री नितेश राणे

बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता वारंवार भासत असते. सागरी वाहतूक आणि बंदर व्यवस्थापन मध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन जेएनपीटी, वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. जर शासनाने परस्पर आपल्या सहकार्यातून कुशल मनुष्यबळ तयार करून रोजगार निर्मिती केली तर राज्याच्या विकासाला नक्कीच अधिक चालना मिळेल शिवाय शासनाच्या विभागांना सहाय्य ठरेल, असे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मत व्यक्त केले.

0000

पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ पदाधिकाऱ्यांसोबत अधिस्वीकृती संदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसप्रकारामध्ये १००% प्रवास भाड्याची सवलत मिळते. मात्र, या सवलतीवर ८,००० किमीची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी वारंवार होत असून, ती मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.  तसेच पत्रकारांना  एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सवलत अनुज्ञेय करावी असे मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले. यामुळे पत्रकारांना जिल्हा व तालुका पातळीवर देखील सेवा देता येईल.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

महावितरणला सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरित करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १७ : ऊर्जा विभागाने वीज निर्मिती व खर्च याबाबत योग्य नियोजन केले तर ग्राहकांना माफक दरात वीज वितरण करणे शक्य होणार आहे. सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरीत करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त विभागाला दिले.

विधानभवन येथे ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना  बोर्डीकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव (वित्त) सौरभ विजय, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सचिव (सुधारणा) ए.शैला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राधाकृष्णन बी., महाऊर्जा विकास संस्थेचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह अधिकारी उपस्थित  होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऊर्जा विभागातंर्गत योजना राबविण्यासाठी वित्त विभागाकडे मागणी केलेल्या सविस्तर प्रस्तावातील सर्व बाबी तपासून घेऊन तातडीने आवश्यक निधी वित्त विभागाने वेळेत वितरीत करावा. राज्यातील वीज वितरण व्यवस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक तिथे नियमांनुसार बदल करावे. थकबाकी वेळेत वसुल होण्यासाठी कार्यवाही करावी. महावितरणला मंजूर झालेला आर्थिक वर्षाचा निधी आणि तूट याची तफावत वाढू नये याची खबरदारी घेण्यात यावी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, पीएम कुसुम योजना या प्रभावीपणे राबविण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे वित्त विभागाने ऊर्जा विभागाने सादर केलेली मागणी विचारात घ्यावी. सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा मिळेल असे दर ठरविण्यासाठी योग्य त्या उपाययोजनाही करणे आवश्यक असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले. ऊर्जा विभागाला सन २०२५-२६ या वर्षासाठी लागणारा निधी, विविध विभागांची वीज देयके थकबाकी, अनुदान वितरणाची सद्यस्थिती, विविध योजनांसाठी केलेली निधीची तरतूद, मेडामार्फत करण्यात आलेली कार्यवाही याचा आढावा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.

अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी ऊर्जा विभागाचे सादरीकरण केले.

******

संध्या गरवारे/विसंअ/

आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 17 : आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नूतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा आज श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील विधानभवनातील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, मुख्य वित्त अधिकारी अनिशा गोदानी आदी उपस्थित होते.

शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरण व नुतनीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शिर्डीतील विमानतळावरील नवीन एटीसी इमारत, नवीन एकात्मिक मालवाहतूक इमारत, नवीन टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे आगामी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, या कामांना गती देऊन ही कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक वाटल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे. तसेच विमानतळासाठी आवश्यक असणारी खरेदी व स्ट्रक्चरल डिझाईनची कामे येत्या आठवड्यात पूर्ण करावीत.

शिर्डी विमानतळ हे मुंबई व नवी मुंबई विमानतळाच्या जवळचे विमानतळ आहे. येथील लहान विमाने पार्किंगसाठी शिर्डी विमानतळाचा वापर होऊ शकतो. त्यादृष्टीने आतापासूनच शिर्डी विमानतळावर सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असल्यास आणखी जमिन संपादित करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

पुरंदर विमानतळासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या विमानतळासाठी लागणारी जमिन संपादित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पुणे, जिल्हाधिकारी यांनी तातडीने सुरू करावी. जेणेकरून विमानतळाचे काम लवकर सुरू होईल. हे विमानतळ सुरू झाल्यावर महाराष्ट्रातील विमानसेवेचे जाळे आणखी विस्तारणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच त्याठिकाणी मोठी विमाने उतरण्याची सोय असावी, त्यासाठी आतापासूनच आवश्यक ती काळजी घ्यावी. या विमानतळावर विमानांच्या हँगरचीही व्यवस्था असावी, असे सांगितले.

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे यांनी सादरीकरणाद्वारे शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामांची माहिती दिली. शिर्डी विमानतळासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनी व कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींनीही माहिती दिली.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

अतिधोकादायक इमारतींतील रहिवाश्यांच्या स्थलांतरासाठी ठोस पर्याय  मंत्री शंभूराज देसाई

भाडेकरू संक्रमण शिबिरात जाण्यास तयार नसलेल्यांना ₹२०,००० भाडे प्रतिमाह

मुंबई, दि. १७ : मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात सध्या ९६ अतिधोकादायक इमारती आढळल्या असून त्यामधील भाडेकरूंना स्थलांतरित करण्यासाठी शासनाने निर्णायक पर्याय दिले आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषद सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रसाद लाड आणि सचिन अहिर यांनी मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, या सर्व इमारतींतील भाडेकरूंना वेळोवेळी नोटीस देऊन स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रात सध्या २०,३६३ संक्रमण गाळे उपलब्ध असून, त्यापैकी ५९० गाळे तातडीने देण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, अनेक भाडेकरू वारंवार नोटीस देऊनही स्थलांतरास तयार नाहीत, ही बाब गंभीर असून यासाठी जून २०२५ मध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

प्रथम निर्णयानुसार, ५ जून २०२५ रोजी सरकारने ठरवले की, जे भाडेकरू संक्रमण शिबिरात जाण्यास तयार नाहीत, त्यांना प्रत्येकी ₹२०,००० भाडे प्रतिमाह दिले जाईल, जेणेकरून ते दुसरीकडे निवास करू शकतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाच्या सहमतीने हा निर्णय घेतला गेला आहे.

दुसरा निर्णय १३ जून २०२५ रोजी घेण्यात आला असून, त्यानुसार १८० व २५० चौरस फूट आकाराचे फ्लॅट असलेल्या काही इमारती तीन वर्षांकरिता भाड्याने घेण्यात येणार आहेत, जे संक्रमण शिबिर म्हणून वापरण्यात येतील.

ही दोन्ही धोरणे भाडेकरूंना समजावून सांगण्यासाठी अधिकाऱ्यांकडून बैठका, जनजागृती मोहिमा आणि थेट संपर्क यांचा अवलंब करण्यात येईल. संबंधित इमारतींमधील लोकांनी सुद्धा मोठ्या संख्येने यासाठी पुढे यावे.

पुनर्बांधणीच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, डीसीआर 79ए मधील सुधारणेनुसार जर मालक पुढे आला, तर त्याच्या प्रस्तावाला ६ महिन्यांत मंजुरी दिली जाईल. जर मालक पुढे आला नाही, तर भाडेकरूंनी सोसायटी स्थापन करून प्रस्ताव मांडण्याचा पर्याय आहे. आणि जर या दोन्हीपैकी काहीच झाले नाही, तर तिसऱ्या पर्यायांतर्गत सरकार संबंधित जागा संपादन करून म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण) तर्फे विकासक नेमून काम हाती घेईल, असेही त्यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

 

मिठी नदी गाळ भ्रष्टाचार प्रकरणाची सन २००६ पासून चौकशी – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 17 : मिठी नदीतील गाळ काढण्यात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी तीन वर्षात 65 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाला असून, संबंधित प्रकरणाची चौकशी 2006 पासून सुरू करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रसाद लाड यांनी मिठी नदी गाळ उपसा बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री ॲड अनिल परब, प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला.

एसआयटीने 2012 ते 2021 या कालावधीत तीन लाखाहून अधिक फोटो तपासले असल्याचे सांगून मंत्री सामंत म्हणाले की, या प्रकरणी सध्या काही आरोपी अटकेत असून, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील दाखल झाले आहेत.

चौकशीत अनेक ठिकाणी काम न झाल्याचे किंवा चुकीचे काम झाल्याचे निदर्शनास आले असून, यामध्ये सहभागी ठेकेदारांची यादी सरकारकडे आहे. संपूर्ण प्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तींचे संरक्षण न करता, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. काढण्यात आलेला गाळ कचराभूमीत न टाकता खासगी जागेत टाकण्यास मान्यता दिल्याने हा घोटाळा झाल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ/

 

गुटखाबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचा विचार – मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, दि. 17 : राज्यात गुटखा व पान मसालाजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री होत असल्याने याला जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकेल का, याबाबत विधि व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेतले जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य श्रीकांत भारतीय यांनी राज्यात गुटखा बंदी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जावी, यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपप्रश्न विचारले.

प्रश्नोत्तराच्या सत्रात उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, सध्याचा जो कायदा आहे, तो वर्षभरासाठीच लागू केला जातो आणि ही 2012 पासून चालत आलेली प्रथा आहे. मात्र यामध्ये आता बदल करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.झिरवाळ यांनी यावेळी राज्यभरात आतापर्यंत झालेल्या कारवायांची माहिती दिली. यात ₹450 कोटींचा मुद्देमाल जप्त आणि 10 हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले.

मंत्री श्री.झिरवाळ यांनी सांगितले की, अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची कमतरता ही एक मोठी अडचण आहे. मात्र, आता नव्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले असून, लवकरच ही अडचण दूर होईल आणि मोठ्या प्रमाणात गुटखा बंदी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्य होईल.

राज्यात विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये काही ठिकाणी कॅन्सरजन्य पदार्थांचे सेवन वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करत दहिसर, मुलुंड, मालाड यांसारख्या परिसरात चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक करून संबंधित गुटखा विक्रीसंदर्भात तपासणी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/

ताज्या बातम्या

विधानसभा कामकाज

0
प्रवासी वाहनांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर प्रदेशासाठी १८००२२०११० टोल फ्री क्रमांक - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, दि. १७ : शहरातील ऑटोरिक्षा,टॅक्सी,ओला-उबर,प्रवासी वाहने तत्सम प्रवासी वाहनांसंदर्भात...

अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १७ : आता अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत घेता येणार आहे. ज्या अनाथ बालकांचे/कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे....

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

0
मुंबई, दि. 17 : बर्कले येथील जागतिक कीर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार केला आहे. विधानभवनातील...

स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी : स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये मिरा-भाईंदर मनपा देशात प्रथम

0
नवी दिल्ली, 17 : स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण...

विधानसभा प्रश्नोत्तरे

0
गोंदिया जिल्हा रुग्णालयातील अडचणींबाबत तात्काळ बैठक घेणार - मंत्री हसन मुश्रीफ मुंबई, दि. १७ : गोंदिया जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या...